Wednesday, July 22, 2009

वायरिंग लोचा!

समलिंगी हा शब्द तसा मला लहानपणीच ऐकायला मिळाला. झाले काय की आमच्या शाळेत एक बोबडा मुलगा होता. त्याच्याकडे सतत नवनवीन इम्पोर्टेड गोष्टी असायच्या. एकदा ह्याचे आणखी कुणाशी तरी भांडण झाले आणि वर्गात आमचे गुरुजी आल्यावर हा रडत त्यांच्या कडे तक्रार घेऊन गेला.
"मास्तर हा बघा ना हा मला म्हणतो की माझे बाबा 'समलींग' करतात"
झालं प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे त्या मुलाला बदडायला उचललेला मास्तरांचा हात एकदम थांबला आणि ते म्हणाले,
" काय? काय करतात म्हणालास? "
ह्याचे भोकाड सुरूच, "समलींग करतात!! "
मास्तरांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला दोघांनाही मास्तर वर्गाच्या बाहेर घेऊन गेले.
आम्हाला हे काहीच कळेना ह्या बोबड्याने स्मगलींगचे 'समलींग' केले तर मास्तरांच्या चेहऱ्याचा रंग का उडाला? समलींग ही भानगड काय असते हा किडा तिथून आला. म्हणजे तसे आमचे सेक्स एज्युकेशन इयत्ता पाचवी पासूनच सुरू झाले होते.
एकदा ऑफ तासाला वर्गात शिक्षक आले आणि म्हणाले,
'मुलांनो तुम्हाला काहीही गोष्टी, विनोद, गाणी सांगायची असतील तर पुढे या आणि सांगा मी मागच्या बाकावर जाऊन काम करतो (म्हणजे एक झोप काढतो).
ह्यावर ओसवाल नावाचं एक ध्यान पुढं आलं आणि म्हणालं, "मास्तर शेर सांगितला तर चालेल का? "
मास्तर म्हणाले चालेल. काय वाट्टेल ते सांग. ह्याने शेर सुरू केला,
"फुल मे सुगंध नही तो फुल का क्या मजा? "
आम्ही सगळे वा वा वा वा करत होतो आणि त्याचे सुरूच
"फुल मे सुगंध नही तो फुल का क्या मजा? "
.....और बिस्तरपे लडकी नही तो सोनेका क्या मजा??"
झालं. अर्धवट झोपेत असलेले मास्तर हा शेर ऐकून जवळपास बाकावरून पडलेच. आणि ह्या सगळ्यातले एक अक्षरही न कळलेले आम्ही पाचवीतले धो धो हसत होतो. मास्तरांनी स्वतःला सावरले पुढे आले आणि ह्या ओसवालला एक कानाखाली भडकवली.
"कुणी सांगितला रे तुला हा शेर? "
"दादाने सांगितला इथेच नववीत आहे तो! "
त्यानंतर ह्याची आणि ह्याच्या नववीतल्या दादाची यथेच्छ धुलाई झाली आणि हा शेर मात्र संपूर्ण शाळेत सुपरहिट्ट झाला. त्याचा अर्थ थोडाफार कळायला लागला असला तरी "समलींग" ही काय नवीन भानगड आहे कळत नव्हतं. शेवटी बराच उहापोह केल्यावर एकाला सुचले. 'अरे, बिस्तरपे लडकी नही तो सोनेका क्या मजा?' असे सगळ्यांचेच नसते काही.
काही जणांचे, 'बिस्तरपे "लडका"नही तो सोनेका क्या मजा?' असेही असते. आणि आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

पण हे सगळे सगळे झाले अनधिकृत लैंगिक शिक्षण. अधिकृतरीत्या शिकायला मिळाले १२वीला बायोलॉजीच्या क्लास मध्ये. विषय बायोलॉजीचा असल्याने आमचे मास्तर चावटपणाचे पर्मनंट लायसन्स मिळाले असल्यासारखे सुटलेले असायचे. त्यांच्या एक एक कोट्या आणि पानचट विनोद तसेच वर्गातल्या छान छान दिसणाऱ्या मुली ह्यामुळे हा क्लास मी कधीच चुकवायचो नाही. असो.तर एकदाचा तो ह्युमन रीप्रोडक्शन हा धडा आला आणि मास्तरांनी अगदी डिटेलवार सगळी प्रक्रिया समजावून सांगितली. त्यात शेवटी एक समलिंगी संबंधाचाही उल्लेख होता त्यावरही मास्तरांनी थोडे विवेचन केले आणि त्या दिवशीचा क्लास संपला. मी माझी वह्या पुस्तके पिशवीत भरत होतो आणि नेहमीप्रमाणे एक दोन कार्ट्या क्लास संपल्यावर उगीचच आपण किती शहाणे आहोत हे दाखवायला मास्तरांना प्रश्न विचारायला वर्गात होत्या. माझ्या कानावर त्यांचे बोलणे पडत होते. तर ह्या दिवटीने प्रश्न विचारला,
"का हो सर पुरुष पुरुष समलिंगी संबंध असतात तसे बायका-बायका मध्येही असतात का हो?"
ह्यावर मास्तर एकदम ओरडला "अहो कसे असतील? घालायला काही नको का?? "
वर पूरक हातवारे आणि हॅहॅहॅहॅहॅ!!!
"म्हणजे जोक्स अपार्ट, असतात असे संबंध त्यांना लेजबियन असे म्हणतात पण ते नक्की काय करतात ते मला माहीत नाही!! हॅहॅहॅहॅ"

तर एकंदरीत असे समलिंगी लेजबियन वगैरे विषयी आमचे शिक्षण झाले. पण ह्याचा खरा अनुभव (म्हणजे हे प्रकरण नक्की काय आहे त्याचा, समलिंगाचा नव्हे :) ) आला तो अमेरिकेत आल्यावर. अधून मधून ही रंगीबेरंगी फुलपाखरे दिसायची आणि "ही इज गे" अशी कुजबुजही ऐकू यायची. मग लक्षात आलं की ज्यांना पुरुष असून नटण्या मुरडण्याची आवड असते, छान छान रंगीत कपडे घालणे, केशरचना करणे, भुवया कोरणे, टाईट्ट टी शर्ट घालणे त्यांना इथे गे (समलिंगी) म्हटले जाते. ह्याचा मी इतका धसका घेतला की रोज आरशात पाहून खात्री करत घेत असे, माझे शर्ट प्यांट म्याचींग नाही ना झालेले. शर्ट थोडासा चुरगळलेला आहे ना. थोडक्यात काहीसे अजागळ दिसत आहोत ना? कारण एकदम टापटीप राहिलो तर कुणालातरी यायचा संशय मी गे आहे की काय?

नंतर हळू हळू गप्पांमधून, टीवीवरून, चित्रपटांमधून ह्या गे लोकां विषयी अधिक माहिती मिळत गेली. मुन्नाभाई मध्ये जसा संजय दत्तच्या डोक्यात केमिकल लोचा झालेला असतो तसाच ह्यांच्या डोक्यात वायरिंग लोचा झालेला असतो इतकेच. बाकी ही माणसे सामान्यच. लाल वायरच्या जागी पिवळी वायर आणि पिवळ्या वायरच्या जागी लाल वायर चुकून लावली गेलेली, त्यामुळे सर्किट पूर्णं होते पण इफेक्ट एकदम उलटा असेच काहीसे. आणि ही सगळी निसर्गाचीच करामत त्यामुळे दोन पुरुष एकत्र येणे ह्यात अनैसर्गिक काय ह्याचे मला आश्चर्य वाटते. उलट जबरदस्ती करून ह्या लोकांना स्त्रियांशी लग्न करायला भाग पाडणे हे मात्र अतिशय अनैसर्गिक वाटते. बहुतांश लोक उजवी असतात पण काही लोकं डावखुरी देखिल असतात तितकेच सोपे हे प्रकरण आहे आणि त्याला तितकेच महत्त्व द्यावे. कुणी निव्वळ डावखुरा असल्याने आपला नावडता नसतो की (डावखुरा आहे म्हणून) त्याचे कौतुकही नसते. सिंपल!

असो तर हे सगळे आठवायचे कारण म्हणजे नुकताच दिल्ली हाय कोर्टाने दिलेला निर्णय आणि त्यावर चाललेल्या प्रतिगामी-पुरोगामी चर्चा आणि वाद. त्या निमित्ताने बरीच कपाटे (क्लॉजेटस) भारतातही उघडली जातील आणि बरेच लोक त्यातून बाहेर येतील समाजाच्या विविध स्तरांमधून विरोध होईल हळू हळू तोही निवळून जाईल आणि ह्या मंडळींना समाजात त्यांच्या सेक्शुअल ओरिएंटेशन सकट स्वीकारलेही जाईल. अर्थात हे सगळे अजून बरेच लांब असले तरी निदान ही क्रिया तरी आता सुरू होईल असे वाटते. मुळात असे काही नसतेच (योग्य की अयोग्य हे लांबचे) हा भ्रम जरी दूर होण्यास ह्यामुळे सुरुवात झाली तरी चिक्कार झाले म्हणायचे. दिल्ली हायकोर्टाचे अभिनंदन!

Monday, March 16, 2009

थँक्यू फॉर स्मोकिंग




चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील पडद्यामागच्या घडामोडी रंजकेतेने दाखवणारे चित्रपट बर्‍याचदा रोचक असतात. ह्याच वर्णनात चपखल बसणारा चित्रपट म्हणजे 'थँक्यू फॉर स्मोकिंग'. नावावरूनच कळते कुठल्या क्षेत्राचे दर्शन घडणार आहे ते. अर्थातच सिगरेट उद्योग. करोडो डॉलर्सची उलाढाल असणारा आणि नैतिकच्या व्याख्यांना आव्हान देणारा कायदेशीर उद्योग म्हणजे सिगरेट निर्मिती. दर वर्षी सरासरी चार लाख लोकांचा एकट्या अमेरिकेत जीव घेणारा हा कायदेशीर धंदा. थँक्यू फॉर स्मोकिंग आपल्याला घेऊन जातो ह्या उद्योगातील पडद्यामागच्या अफलातून सफरीवर. निक नेलर नावाच्या एका टोबॅको लॉबिस्टच्या नजरेतून.

निक नेलरच्या कामाचा प्रमुख उद्देश म्हणजे सिगरेट उद्योगाची बाजू मांडणे. त्यावर उडलेले रक्तरंजित शिंतोडे धुऊन काढणे. जो उद्योग लाखो लोकांचे लहान मुलांचे प्राण घेतो आणि प्रचंड टीकेच्या अग्रभागी असतो अश्या उद्योगाची बाजू मांडणे हे महाकठीण काम म्हणजे निक नेलरची रोजी रोटी. चित्रपटाची सुरुवातच होते टीव्ही वरील एका परिसंवादाच्या कार्यक्रमातून. ह्या कार्यक्रमात सिगरेटच्या व्यसनाने कॅन्सर झालेला एक तरुण, एका तंबाखू विरोधी राजकारण्याचा प्रवक्ता आणि निक नेलर असे एकत्र परिसंवादात भाग घेतात. अश्या ह्या संवादात निक नेलर केवळ आपल्या चतुराईने आपल्या विरोधकांना कसे निरुत्तर करतो ते बघूनच कल्पना येते की चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे. तिथून सुरू होतो निक नेलरचा प्रवास. सतत कसल्या ना कसल्यातरी कॢप्त्या योजून विरोधकांना निरुत्तर करणे आणि त्याच वेळेला सिगारेटचा खप वाढण्यासाठी पद्धतशीर यंत्रणा राबवणे हे एका ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे सादर केले आहे. अतिशय धूर्त वाक् चतुर, एका मुलाचा बाप असणारा घटस्फोटित निक नेलर ऍरन एकहार्टने खूप छान साकारला आहे. 'सब गंदा है पर धंदा है ये' ह्या भूमिकेतून तो आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक राहून करत असलेल्या युक्त्या पाहून खूप करमणूक होते. राजकारणी, उद्योगपती, चित्रपट व्यवसायातील लोक अशी पूरक पात्रे आपल्याला ह्या सगळ्यातील गुतांगुंत आणि एक निराळीच बाजू दाखवतात.

निकच्या आणि त्याच्या मुलामधील प्रसंगही छान रंगवले आहेत. मुलगा सतत बापाला प्रश्न विचारत असतो आणि त्याच्या उत्तरांमधून निक नकळत त्याला आपला मुद्दा कसा मांडायचा, आपला मुद्दा खरा ठरवण्यासाठी दुसऱ्याला खोटं ठरवलं की झालं वगैरे गोष्टी नकळत शिकवत असतो ते प्रसंग खूप छान जमले आहेत. चॉकलेट आइसक्रीम आणि व्हेनिला आइसक्रीमचे उदाहरण घेऊन तो ज्या पद्धतीने लहान मुलाला समजेल अश्या भाषेत आपला युक्तिवाद समजावून सांगतो तो प्रसंग तर खासच. सिगरेट उद्योगाचा लॉबिस्ट निक तर त्याचे खास मित्र म्हणजे मद्यनिर्मिती उद्योगाची लॉबिस्ट आणि बंदुका हत्यारे उद्योगांचा लॉबीस्ट. असे हे रूढार्थाने समाजातील खलनायक वाटावेत असे तिघे मिळून जेवायला भेटत असतात आणि त्यावेळेला त्यांच्या होणाऱ्या गप्पांचे प्रसंगही रंजक आहेत. तसेच निकला शेरास सव्वाशेर भेटणारी आणि आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून बरीच गुपिते काढून घेऊन वर्तमान पत्रात छापणारी संधी साधू पत्रकार केटी होम्सने छानच दाखवली आहे.

सिगरेटी आणि तंबाखू उद्योग अश्या विवादास्पद विषयावर आधारीत चित्रपट असूनही कुठेही त्याला रुक्ष डॉक्युमेंट्रीचे स्वरूप नाही. कसलाही मेलोड्रामा नाही लांबलचक आरोप आणि कंटाळवाणी भाषणबाजी नाही आणि उगीच संदेशांचा भडिमार तर नाहीच नाही आणि त्यामुळेच दिग्दर्शक (जेसन राईटमन) चित्रपट रंजक करण्यात त्याचे करमणूक मूल्य अबाधित ठेवण्यात प्रचंड यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. ह्या चित्रपटाला असलेली काळ्या विनोदाची झालर आणि पटापट सरकणारी पटकथा ह्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. क्रिस्तोफर बकलीच्या कादंबरीवर आधारलेला आणि खरं तर अतिशय गंभीर विषयावरील तरीही हलका फुलका असणारा हा चित्रपट त्याच्या वेगळेपणामुळे नक्कीच बघण्यासारखा.

Saturday, March 14, 2009

जॅझची निळाई

miles davis


१९५९ साल. बरोब्बर पन्नास वर्षांपूर्वीची एक दुपार. न्यूयॉर्क मधील एका स्टुडिओत एक सुरांचा अवलिया त्याच्या सहा साथीदारांसहित आला. ती पूर्ण दुपार आणि संध्याकाळ त्यांनी एक अजरामर कलाकृती घडवण्यात घालवली. निमित्त होते 'काइंड ऑफ ब्लु' ह्या आजच्या घडीला जगातील सगळ्यात प्रसिद्ध जॅझ अल्बमची निर्मिती. आणि हा अवलिया म्हणजे 'माइल्स डेव्हिस' नावाचा संगीतकार. जॅझ संगीताच्या जगभरातील कुणाही दिवाण्याच्या संग्रहात हा एक अल्बम असलाच पाहिजे अशी ही अमर कलाकृती.

अमेरिकन किंवा पाश्चात्य संगीत म्हटलं की आपल्या समोर पहिल्यांदा येते ते रॉक आणि पॉप संगीत पण त्याचबरोबर १९ व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या मातीत जन्माला आलेला एक आगळा वेगळा संगीताचा आविष्कार आणि तो म्हणजे 'जॅझ'. अफ्रिकन आणि युरोपियन अश्या दोन्ही प्रदेशातल्या संगीतातून प्रेरणा घेऊन त्यांचा अनोखा मिलाफ जॅझमध्ये करण्यात आला. गांजलेल्या, पिचलेल्या, शोषितांच्या वेदनेला वाट करून देण्यासाठी पाझरलेले सूर म्हणजे 'जॅझ'. गुलामगिरीच्या पाशात अडकलेले हजारो कृष्णवर्णीय जॅझच्या सुरात न्हाऊन निघाले. वेदनेतून झालेला कलेचा आविष्कार हा नेहमीच अतिशय सच्चा असतो व्यावसायिकतेची लागण त्याला झालेली नसते. आणि अगदी हेच दिसून येते जॅझच्या सुरांमधून. काही आठवड्यांपूर्वीच्या न्यूजवीकमध्ये एक फार छान लेख आला होता त्यातला लेखक म्हणतो की, माइल्स डेव्हीसचे सूर म्हणजे, "अनविलिंग टू काँप्रमाइज हिज आर्ट टू प्लीज ऑर अपीज. " कुणाचीही खुशमस्करी करण्यासाठी अथवा समजूत काढण्यासाठी हे सूर नकार देतात. कारण हे संगीत म्हणजे थेट त्याच्या भावनेचा आविष्कार आहे. आणि त्यामुळेच अजूनही हे सांगितं टिकून राहिले आहे. आजच्या घडीलाही ह्या अल्बमच्या आठवड्याला ५००० प्रती खपतात हा त्याचा पुरावा.

जॅझ म्हणजे नुसते सूर. शब्दांच्या पालीकडले. शब्द नसले तरी गूढ काव्य सादर करणारे सूर. माईल्स डेव्हिसच्या ह्या अल्बमने तिथेच सगळ्यांना भुरळ घातली. अगदी राष्ट्राश्यक्ष ओबामा देखिल त्यांचा आयपॉड वरती माइल्स डेव्हीसचे काइंड ऑफ ब्लू ऐकतात असे अभिमानाने सांगतात. बिल कॉस्बी नावाचा विनोदवीर तर आठवण सांगतो की त्याच्या कॉलेज जीवनात त्याला साथ केली ह्या सुरांनीच. सकाळ झाली की पहिले काम म्हणजे काइंड ऑफ ब्लु मधील त्याचे आवडते गाणे सुरू करणे आणि त्याच्या तालावर प्रत्येक दिवसाची सुरुवात करून अख्खे कॉलेज जीवन काढले.

जॅझची ओळख मलाही नुकतीच झाली. जे काय कानावर पडले ते खूप आवडले. पुन्हा पुन्हा ऐकले तेव्हा अजून आवडले. आणि त्यातुनच इतक्या सुंदर संगीतप्रकारा विषयी इतरांनाही सांगावे म्हणून हा लेख लिहावासा वाटला.

इथे ऐका काईंड ऑफ ब्लु मधील मला सगळ्यात आवडलेले गाणे : "सो व्हॉट"


Thursday, February 5, 2009

इंटरनेट एक्स्प्लोररला राम राम!

आजपर्यंत इंटरनेट एक्स्प्लोरर विषयी कितीही वाईट वाचले असले तरी आज पर्यंत मी तोच ब्राउजर मुख्य ब्राउजर म्हणून वापरत होतो. ह्यामागचे एकमेव कारण म्हणजे ह्या ब्राउजरमध्ये अतीशय सूबक दिसणारी अक्षरे विशेषतः मराठी स्थळांवरील. खूप काही केले तरी मला आय ई वर जशी अक्षरे उमटतात तशी फायरफॉक्स किंवा क्रोमवर उमटत नव्हती. शेवटी आज वेळ मिळाल्यावर काही क्लुप्त्या करुन बघीतल्या आणि आता कोणतेही स्थळ फायरफॉक्स किंवा क्रोम मध्ये जसेच्या तसे आय ई सारखे दिसु लागले आहे. माझ्याप्रमाणेच आणखी कुणी देखिल आय.ई. निव्वळ त्याच्या सौंदर्यामुळे वापरायचे थांबत नसेल तर त्यांच्यासाठी मी इथे स्टेप बाय स्टेप कृती देतो आहे.

१) सर्वप्रथम सीडॅकचा योगेश हा टंक इथुन उतरवुन घ्या.

२) हा टंक संगणकावर व्यवस्थित इंस्टॉल करा. कंट्रोल पॅनेल - फाँट्स- इंस्टॉल न्यू फाँट्स्

३) आता तुमच्या ब्राउजरमध्ये जाऊन देवनागरीसाठी हा फाँट निवडा. फायर फॉक्स मध्ये टूल्स् - ऑप्शन्स - कंटेंट्स् -फाँट्स् अँड कलर्स् -ऍडव्हान्स्ड्



आता तुमच्या फायरफॉक्सवर देखिल उपक्रम/मनोगत/मिपा/बजबजपुरी इ. ठिकाणी वापरलेला फाँट दिसू लागेल. पण अजुनही आयई इतका गुळगुळीतपणा अक्षरांना येणार नाही. त्यासाठी खालील स्टेप्स :

१) डेस्क्टॉप वरती मोकळ्या जागेत कुठेही जाऊन राईत क्लिक करुन प्रॉपरटीज उघडा

२) तिथे ऍपिअरन्स ह्या टॅब वरती टिचकी मारुन इफेक्ट्स् वरती क्लिक करा.



३) खालीच चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टँडर्ड एइवजी 'क्लियर टाइप' निवडा.



बस! तुमच्या फायरफॉक्स मध्ये आता अक्षरे आयई सारखीच सुबक गुळगुळीत दिसू लागतील. ह्याचा आणखी एक फायदा म्हणजे असे केल्यानंतर आता मला निव्वळ मराठी स्थळेच नाहीत तर सगळे मराठी ब्लॉग देखिल माझ्या आवडत्या फाँटमध्ये बघता येतात.

माझी ही एकमेव अडचण फायरफॉक्सने दूर केल्याने आता आमचा तरी आयई ला कायमाचा राम राम!!

Thursday, January 8, 2009

विंडोज ७

बरेच दिवस गाजत असलेली मायक्रोसॉफ्ट विंडोजची पुढची आवृत्ती (विंडोज ७) लास वेगास मधील तंत्रज्ञान परिषदेत सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली. सध्यातरी बेटा आवृत्ती असणार्‍या विंडोज ७ मध्ये युजर इंटरफेस अधिक आकर्षक बनवण्यासाठी अनेक बदल करण्यात आलेले आहेत. बरीच हवा झालेल्या व्हिस्टाच्या अपयशासमोर विंडोज ७ आता काय गुण दाखवतो हे नजिकच्या काळात पाहुया. तोपर्यंत पाहा विंडोज ७ चे काही स्क्रीनशॉट्स्











सविस्तर बातमी इथे.

Tuesday, December 30, 2008

गझनी




१५ मिनिट टीकणारी स्मृती घेउन प्रेक्षक चित्रपट बघायला येतात ह्या समजातुन आमिर खानचा नविन गझनी हा चित्रपट बनवला आहे. समोरच्या प्रसंगात काय चालले आहे ह्याची १५ मिनिटापुर्वीच्या चित्रपटाशी सांगड घालायचा प्रयत्न केलात तर तुम्ही फसलात. कशाचा कशालाही आगापीछा नाही. पोलिस अधिकारी बसपेक्षा जोरात काय धावतो, घरी गेल्यावर नायकाला बदड बदड बदडुन बांधुन घातल्यावर त्याची डायरी काय वाचत बसतो, आणि पुढची पाने सापडली नाहीत म्हणून एकदम 'आता मला पुढे काय झाले त्याची गोष्ट सांग' असा हट्ट काय धरतो, सगळाच आनंदी आनंद.

भरपुर बजेट घेउन मी आता वाट्टेल ते बनवणार, कथा कशीही वळणे घेणार कॅमेरे कुठेही लावणार पटकथेत काहीही घुसडणार असे मनाशी ठरवुन दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवला आहे. अर्धा अधिक चित्रपट संपेपर्यंत तुम्ही चिकाटी धरलीत तर चित्रपटातल्या नायका प्रमाणे कुणीतरी आपल्याही डोक्यात एक रॉड घालुन कायमचे मतीमंद बनवावे असे वाटायला लागते. बरं बौद्धीक दिवाळखोरीची हद्द म्हणजे हे सगळे एका दुसर्‍याच चित्रपटावरुन उचलेले आहे, आणि हा चित्रपट एकदा दक्षीणेत जसाच्या तसा बनवुन झालेला आहे. चित्रपटाची कथा वगैरे जाणुन घ्यायच्याही फंदात पडू नका. आमीर खानच्या गोंदवण्याची देखिल फुकटची हवा केलेली आहे. हे गोंदवणे मूळ इंग्रजी चित्रपटात आहे म्हणून दिग्दर्शकाने इथेही आणले पण १५ मिनिटांनी तो स्वतःच विसरुन गेला असावा असे का केले ते. कारण चित्रपटाच्या सुरुवातीला शर्ट काढुन बॉडी दाखवण्यासाठी हे 'गोंदवलेकर महाराज' उभे राहतात खरे पण पुढे त्या गोंदवण्याचा कथा विस्तारात फारसा काहीही संबध नाही. असा इथे कशाचाच कशाशी संबध नाही तर गोंदवण्याची फिकिर तरी कशाला म्हणा.

चित्रपटाच्या शेवटी शेवटी तर दिग्दर्शक आता काय काय करामत्या करु शकेल ह्याचे आडाखे बांधण्यातच आम्ही वेळ घालवला. उदा. देमार हाणामारी, दिसेल त्याला उचलुन आपटून शेवटी एकदाचा हा गझनी त्या सिंघानियाच्या तावडीत सापडाल्यावर तो त्याला मारुन न टाकता, त्याच्या डोक्यात देखिल नेमक्या अचुकतेने रॉड घालुन त्याची देखिल स्मृती भ्रष्ट करेल आणि वर 'तुम्हे मारकर छुटकारा दिलानेसे अच्छा तो मै तुम्हारा '१५ मिनिट मेमरी' वाला गेम बजाके तुम्हारी जिंदा लाश देखना चाहता हू!' असला काहीतरी डायलॉग मारुन उर्वरीत आयुष्य दोघेही अंगभर गोंदवुन गोंदवल्याला जाउन राहतील असले काहीतरी भन्नाट आडाखे मी बांधत होतो. पण चौफेर उधळालेली दिग्दर्शकाची कल्पना शक्ती आमच्या ह्या कल्पकतेसमोर थिटी पडली. आणि शेवट गझनीला ठार मारुनच झाला. (चित्रपटाच्या शेवटी गझनी सिंघांनियाला मिळेल का? वगैरे उत्कंठा ताणुन घेणार्‍यांसाठी 'स्पॉइलर अलर्ट' बरंका)

बॉलीवुड मध्ये चित्रपट निवडण्यात सगळ्यात चूझी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आमिर खानने हा चित्रपट का निवडला असावा हे न उलगडेले कोडे आहे. त्याच्या डोक्यात खरोखरच रॉड घालुन हा चित्रपट त्याला दाखवला असावा का? अशी एक शंका मनात येते. त्याचा ह्यातील अभिनय बघता त्याला कथा नायकाला स्मृतीभ्रंश नसुन बुद्धीभ्रंश झाला आहे असा त्याचा गैरसमज झालेला वाटतो. बॉडी बिल्डींगचे वगैरे मोप कौतुक झाले असले तरी मला त्यात काही तितके विशेष वाटले नाही. मुळात उंचीत मार खाल्ल्यामुळे नुसतेच ८ पॅक बनवले म्हणून तो अवाढव्य राक्षसी वगैरे अजिबात वाटत नाही. मागे कमल हासनचा 'अभय' नावाचा एक टूकार चित्रपट आला होता त्यात त्याने बनवलेली बॉडी ह्याहुन कितीतरी सरस होती. असो तसेही 'राजा हिंदुस्तानी', 'मेला' वगैरे महान चित्रपट बघीतल्यावर आमिर खानच्या बाबतीत 'नावाजलेला गुरवा देवळात जाउन ***' ह्या म्हणीचा प्रत्यय आलाच होता आता आणखी एक दाखला मिळाला इतकेच.

Tuesday, December 16, 2008

कराचीसे चांदनवाब :)

मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानातील काही चॅनेल्सवरुन उधळलेली मुक्ताफळे आजकाल युट्युबच्या सौजन्याने आपल्याला देखिल बघायला मिळतात. असेच व्हिडीओ बघत असताना हा अत्यंत विनोदी प्रकार पाकिस्तानातील इंडस न्युज नावाच्या चॅनेलवर बघायला मिळाला. ह्यातील पत्रकार त्याची बोलण्याची शैली, कामातील एकाग्रता एकुणच राग रंग आवर्जुन बघण्यासारखे आहे. ज्याने कुणी चावटपणा करुन ही क्लिप लीक केली त्याचे अनेक आभार.बर्‍याच दिवसानी युट्यूब वर चांगले खळखळुन हसायला मिळाले.

Thursday, December 11, 2008

सुपर अँटीस्पायवेअर

अचानक कालपासुन संगणकावर कुठलीही साईट उघडली की एखादा पॉप अप उपटू लागला. मी उघडलेल्या साईट्सही नेहमीच्याच होत्या. तिथुन पॉप अप्स येत नाहीत ही खात्री होती. दोन तीनदा हा प्रकार झाल्यावर लक्षात आले, कुठलातरी ऍडवेअर/मालवेअर सारखा विषाणू घुसला आहे. लगेच आयईची सगळी कॅश मोकळी केली आणि कुक्या/हिस्ट्री वगैरे उडवुन लावले. पुन्हा ब्राउजींग सुरू केले तरी तोच प्रकार सुरू झाल. मग लक्षात आले की आपल्याकडे कुठलेही स्पायवेअरच नाही. लगेच 'विंडोज डिफेंडर' डाउनलोड केले आणि सगळा संगणक पिंजुन घेतला. त्याने किरकोळ एक दोन ट्रॅकिंग कुक्या उडवल्या पण त्यानंतरही बाकीची स्थिती जैसे थेच. आता मात्र लक्षात आले की काहीतरी गंभीर प्रकरण आहे. मग स्टार्टअप मध्ये जाउन कुठल्या कुठल्या प्रोसेसेस लोड होताहेत ते बघीतले तर त्यात एक विचित्र डीएलएल फाईल दिसली. त्या फाईलच्या नावाने गुगलले असता १-२ डिस्कशन बोर्ड्सवरच त्याची नोंद आढळली आणि तिथले पब्लिक हि फाईल विषाणू आहे म्हणून बोंबलताना दिसले. मग मात्र प्रकरणाला चांगलेच गांभिर्य आले. मी लगेचच माझा मकॅफी अँटी व्हायरस अपडेट केला आणि पुन्हा संगणक पिंजून काढला. जवळपास २-३ तास घेतल्यावर त्यातुनही काही फारसे हाताला लागले नाही आणि मूळ समस्या तशीच. आता मात्र काय करावे कळेना.

शेवटी गुगलबाबावर विश्वास ठेवुन आणखी काय उपाय आहेत का ह्याचा शोध एक शेवटचा प्रयत्न म्हणून सुरू केला. त्यातुन एका ठीकाणी मला 'सुपर अँटीस्पायवेअर' ह्या नविनच सॉफ्टवेअर विषयी माहिती मिळाली. त्यांच्या संकेतस्थळावर जाउन ते मोफतच आहे ना, कसल्याही जाहिराती घुसडत नाही ना इ. इ. ची कसुन माहिती काढली. कारण बर्‍याचदा ही नाव न ऐकलेली सॉफ्टवेअर्स भिक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था करुन ठेवतात. सगळी खात्री झाल्यावर शेवटी एकदाचे ते डाउनलोड केले, आणि नामवंत डॉक्टर्सनी हात टेकल्यावर शेवटचा उपाय म्हणून रुग्णाला जसे कोण काय सांगेल ते देतात तश्या अवस्थेत पुन्हा एकदा संगणक ह्या सॉफ्टवेअर कडून पिंजुन घेतला. "साध्या सुध्या व्याधी तर कुणीही बरे करते आम्ही असाध्य व्याधी देखिल बर्‍या करतो" असे काही तरी स्लोगन आले आणि उपचार सुरू झाले. जवळपास १-२ तास खाल्ल्यावर माझ्या संगणकात ह्याने बरेच काय काय शोधुन काढले. निरनिराळ्या ४१ व्याधी दाखवल्या आणि त्यावर उपायही केले. मी संगणक रिस्टार्ट केला आणि ब्राउजींग सुरू केले तर अहो आश्चर्यम!! मूळ समस्यातर दूरच नेटचा स्पीड पूर्वीपेक्षा किंचीत जास्त वाटत होता. सुपर अँटीस्पायवेअर ने झक्कास काम केले आणि माझी बराच ताण हलका केला. भविष्यात आणखी कुणाला असा त्रास उद्भवल्यास वेळ आणि ताप वाचावा म्हणून माझा अनुभव इथे द्यावासा वाटला.

सुपर अँटीस्पायवेअर इथे मोफत उतरवुन घेता येते. तुमच्या संगणकावर देखिल एक ट्रायल घेउन बघाच.

माझा संगणक : विंडोज एक्सपी आणि इंटरनेट एक्सप्लोरर.
----------------------------------------------------------------------------------------------
डिस्क्लेमर : माझा सदर सॉफ्टवेअर बनवणार्‍या कंपनीशी कसलाही संबध नाही, ज्याने त्याने आपापल्या जवाबदारीवर उतरवुन घ्यावे.

Wednesday, December 3, 2008

"अ-हिंसा"

महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसावाद ह्या विषयी भारतातल्या प्रत्येकाला काही ना काही मत असतेच. बहुतांश वेळेला ही मते आंधळ्या गांधी भक्तीने वा आंधळ्या गांधी द्वेषाने पूर्वग्रह दुषित असतात. ह्या पार्श्वभूमीवर डॉ.धनंजय वैद्य ह्यांचे अभ्यासू लेखन मला वेगळे आणि विचार करण्याजोगे वाटले. डॉ.धनंजय वैद्य ह्यांचे विचार त्या निमित्ताने इथे(त्यांच्या परवानगीने)प्रकाशित करत आहे.

----------------------------------------------------------------

"अ-हिंसा" हा शब्द (=नॉन-व्हायोलेन्स) हा भारतातला खास आहे. बाकी देशांत पीस/पाक्स/सलाम/शालोम वगैरे कल्पना साधारण हिंसेपासून मुक्त स्थिती दर्शवतात. पण त्यामध्ये काही सूक्ष्म धोरणात्मक फरक असतो.

अहिंसेचे तत्त्व अनेक संस्कृतींमध्ये सैद्धांतिक पातळीवर लोकांना आवडते. (दुसरा गाल पुढे करणे, हे येशूचे बोल, भारतीय नव्हेत.) अशा प्रकारचे (सैद्धांतिक) धोरण अत्यंत मर्यादित स्वरूपात रानटी टोळ्यांतही आढळते. सर्वात मर्यादित स्वरूपात हे धोरण "स्वकीयांवर हिंसा करू नये" असे आहे. टोळ्यांपासून नागरी संस्कृती निर्माण झाली, तसे हे (सैद्धांतिक) धोरण पुढे चालू राहिले. फक्त टोळ्यांमध्ये "स्वकीय" कोण ही सहज व्याख्या आहे - आपल्या टोळीत जन्मलेला पुरुष = स्वकीय. नागर संस्कृतींमध्ये "स्वकीय"ची व्याख्या बदलत राहाते - याबाबत "राष्ट्र" ही कल्पना मागील काही शतकांत विकसित होऊ बघत आहे, पण कित्येक राष्ट्र-राज्ये इतकी मोठी आहेत, की टोळीबद्दल जी सहज आपुलकी आणि ओळख वाटे, ती राष्ट्रातील सर्व नागरिकांबाबत सहज वाटत नाही. कोण स्वकीय? हे स्पष्ट नसल्यामुळे राष्ट्र-हेच-कुटुंब किंवा विश्व-हेच-कुटुंब अशा प्रकारे काही लोक अहिंसा तत्त्वाची (सैद्धांतिक) व्याप्ती करतात. आशा प्रकारचे शब्द जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये दिसतात.

हे सैद्धांतिक धोरण प्रत्यक्षात कोणी स्वकीयांबद्दलही तंतोतंत पाळत नाही. त्यामुळे "स्वकीय"ची व्याप्ती वाढत राहिली, तसे हे धोरण लोक कमीकमीच वापरतात. यामध्ये भारतीयही आलेच. भारतामध्ये बाकी देशांपेक्षा हिंसा कमी आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. भारतात हिंसेच्या विरोधात तोंडपूजा खूप होते, पण तशी सर्वच देशांत होते.

- - -
गांधींनी अहिंसा हे धोरण म्हणून वापरले (अर्थात त्यांची ती श्रद्धाही होती). "क्विट इंडिया" भाषणात ते तसेच काही म्हणतात -

http://www.ibiblio.org/pha/policy/1942/420807a.html

"I want you to adopt non-violence as a matter of policy. With me it is a creed, but so far as you are concerned I want you to accept it as policy."

त्या नंतर हे धोरण म्हणून अनेक नेत्यांनी वापरलेले आहे. (वेळ आल्यास हिंसा वापरणारे नेल्सन मंडेला, आणि त्या पायरीपर्यंत न पोचलेले मार्टिन ल्यूथर किंग [धाकटे], हे तर प्रसिद्धच आहेत).

भारतात जनसामान्यांत इंग्रजविरोध हा फार प्रखर नव्हता. इंग्रजांसाठी त्या काळात पर्याय होता एतद्देशीय राजे-राजवाडे. या ऐशबाज राजवाड्यांबद्दल लोकांची राजभक्ती अगतिक होती. १८५७च्या युद्धात फक्त यमुना-गंगेच्या खोर्‍याने पेट घेतला, त्यातही जनसामान्याचा सहभाग कितपत होता कोणास ठाऊक. डुकराच्या आणि गाईच्या चरबीने पुसलेली काडतुसे शिपायांनाच त्रास देणार. खालसा झालेली राज्ये त्या राजे-राजवाड्यांनी आधीच स्वखुशीने ब्रिटिशांच्या स्वाधीन केली होती. लोकांना ब्रिटिशांचा खास राग वाटण्यासारखे काय होते? (देशाची आर्थिक लूट, वगैरे, हे सर्व अर्थशास्त्राच्या अभ्यासाने दिसू शकते. ते आकडे कोण्या सामान्य व्यक्तीला कसे दिसणार?)

जनसामान्यात जोवर इंग्रजविरोधी भावना चेतलेली नव्हती, तोवर हिंसक स्वातंत्र्यसैनिकांना फारसे यश मिळू शकणे दुरापरस्त दिसते. जे झाशीच्या राणीला जमले नाही, गनिमी कावा करत तात्या टोप्याला जमले नाही, ते चाफेकरांना एक-दोन ब्रिटिश अधिकारी मारून कसे जमणार होते?

ज्यांच्यासाठी चळवळ करायची, त्यांनाच चळवळ त्रासदायक वाटते, त्या परिस्थितीत हिंसा हे धोरण फारसे उपयुक्त नाही. आशा हिंसेत तडफदार चळवळी नेते नाहक मरतात. लोक पेटले असले, तरच ते बलिदान सत्कारणी लागते. अशा परिस्थितीत अहिंसक चळवळ हीच शक्य असते. विचार करूया - लोकमान्य टिळकांनी "हिंसक" असे नेमके काय केले - नव्हे, तेसुद्धा धोरणात्मक अहिंसा-पालकच होते. गांधींचे कल्पक वैशिष्ट्य असे, की वेगवेगळ्या नवनवीन अहिंसक क्रिया-प्रक्रिया योजून त्यांनी लोकांना असंतुष्ट केले. (लोकमान्य हे "असंतोषाचे जनक" होते, तर त्या असंतोषाला लहानाचे मोठे केले गांधींनी).

"अहिंसा" हे केवळ धोरण आहे, ही बाब गांधींना ज्ञात असावी. म्हणूनच काँग्रेस सरकारे होती (१९३५ मध्ये निवडणुका झाल्या) तिथे पोलीस खाती बरखास्त नाही झालीत. १९४७ मध्ये गांधींनी श्रद्धेस जागून हिंसेबद्दल तक्रार केली, पण काश्मीरात ऑक्टोबर १९४७ मध्ये भारतीय सैन्य जाण्याबद्दल खूप तक्रार केली नाही.

(५५ करोड रुपये पाकिस्तानाला देण्याबाबत सरकारला भाग पाडले, म्हणजे काश्मीर कारवाईसुद्धा ते अडचणीत आणू शकत होते...)

हा शांतताप्रिय अहिंसक नेता तसा सश्रद्ध असला तरी बराच धोरणी होता, मुत्सद्दी होता. त्यांची अनेक धोरणे त्यांना हवी तशी फळली नाहीत. पण हे तर सर्वच मुत्सद्द्यांचे होते. नाना फडणविसांना तरी १००% यश मिळत असे काय?

गांधींच्या धोरणांचा "पोलिटिकल सायन्स"च्या दृष्टीने, त्यांना फालतू देवत्व न देता विश्लेषण नरहर कुरुंदकरांनी "जागर" लेखसंग्रहात केलेले आहे. गांधी हे नेभळट किंवा पढतमूर्ख होते, ही कल्पना ते सप्रमाण खोडतात.

आपल्या शाळेतल्या पाठ्यपुस्तकांनी त्यांना चमत्कारी संत केले, आणि जनसंघाच्या नेतृत्वाने यडपट संतबोवा केले. मध्ये नेहरूंच्या भाटांनी पण त्यांना भाबडा संतबोवा केले. पण एक उत्तम राजकारणी म्हणून कुरुंदकरांनी मला त्यांची ओळख करून दिली, तेव्हा मला त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. ज्या नेत्याचे अनेक विचार पटत नाहीत, त्या नेत्याबद्दल जसा आदर वाटतो तसा आदर वाटतो.

भारताच्या सुस्त जनतेला हिंसेने (१८५७ चे मोठे प्रकरण, चाफेकर-कान्हेरे वगैरे स्थानिक प्रकरणे, यांनी) मुळीच जागे केले नाही, तिथे गांधीनी लाखोंना कामधंदा सोडून सरकारची आडवणूक करण्यास उद्युक्त केले."अहिंसा" तत्त्वाचा हा सुज्ञ वापर होय, असे मला वाटते. गांधींना राजकारण खेळता येत नव्हते, हे माझ्या मते त्यांच्याविरुद्ध त्यांच्या भक्तांनी केलेले लांछन आहे. आणि त्यांनी खेळलेल्या राजकारणाने भारताच्या जनतेचा (तोट्यापेक्षा अधिक) फायदा झाला नाही असे म्हणणेही तितकेच अज्ञानमूलक आहे, असे मला वाटते.

- डॉ.धनंजय वैद्य

Tuesday, November 18, 2008

(अ)निवासी

अखेर सगळी माणसे
निवासी काय अनिवासी काय.

साले एनाराय तिकडे बसुन मजा मारतात
वर इकडच्या नावाने बोटे मोडतात
तिकडच्या थंडगार हापीसात बसून
इथल्या भुकबळींवर चर्चा रंगतात..

"अरे इतकीच काळजी वाटते तर या ना परत भारतात"

मग अनिवासींनी मांडायचा डॉलरचा हिशोब
गेल्याच महिन्यात पाठवलेल्या
वनवासी कल्याण आणि आश्रम शाळेला
त्यासोबत एक सल्ला सार्‍या निवासी जनतेला

"दान धर्म सोडा,निदान वेळच्या वेळेला इन्कम टॅक्स भरा.."

शेवटी अनिवासी काय निवासी काय?
हजारातला एखादा बाबा आमटे
तर हजारात नउशे बाबा भामटे
काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.

Tuesday, November 4, 2008




पुण्यामध्ये लोकांना कांदा पोह्यांवर सांबार घालून खाताना पाहिले आहे. होय होय..ज्यात इडली नामक पदार्थ बुडवुन खातात तेच सांबार! इडली सारख्या सौम्य मृदु स्वतःची अशी फारशी चव नसणार्‍या (म्हणजे बेचव नव्हे हा!) इडलीवर ते वाफाळणारे चचमीत सांबार घालून खायला छानच लागते. पांढरी शुभ्र हलकी फुलकी इडली आणि त्याच्या बाजुला एका वाटीत, (इडलीवरच बचकन ओतलेले नव्हे) लालसर सांबार ही जोडी म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटतो. पण ह्याच दक्षीणेच्या सांबाराचे लगीन मराठमोळ्या कांदा पोह्यांशी का लावले जाते हे म्या पामराला तरी अगम्य वाटते. कांदा पोह्यांचा एकमेव जोडीदार म्हणजे गरमा गरम वेलदोडा युक्त अमृततुल्य चहा. (आणि तो देखिल बाजुला एका कपात बरका! पोह्यांवर घालुन नाही :)) इडली सोबत सांबार फुकट (पाहिजे तेवढे)मिळते म्हणून पोह्यांचा भाव कमी झाल्याने पोह्यांवर देखिल सांबार ओतुन खायची प्रथा पुण्यात पडली असावी. पण उद्या सांबारा सारखे चहा देखिल काँप्लिमेंटरी द्यायला लागले तर इडली चहात बुडवुन खाणार का असा प्रश्न मला पडतो.

असो ह्या सगळ्याची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे ह्या आठवड्यात अमेरिकेत सुरु होणारा डे लाइट सेव्हींग प्रकाराची सांगता (की सुरुवात नक्की माहित नाही :")) आत तुम्ही म्हणाल डॅ लाइट सेव्हिंग आणि पोह्यात सांबर घालुन खाण्याचा काय संबध? सांगतो.. जगात लोक बर्‍याचदा काही गोष्टी का करतात? असा प्रश्न जेव्ह जेव्हा मला पडतो तेव्ह तेव्हा ह्या सांबार पोह्यांची आठवण होते. पोह्यांवर सांबार घालुन का खाल्ले जाते हे जितके अगम्य आहे तितकेच हे डे लाईट सेव्हिंग प्रकरण (माझ्यासाठी) अगम्य आहे. अचानक एका दिवशी सगळ्यांनी आपापल्या घडाळ्यातील काटे उलटे फिरवायचे, आठ वाजले असताना नऊ वाजले म्हणायचे ह्यातुन नक्की काय साध्य होतं ते मला अजुनही उलगडलेलं नाही. आपल्याला सकाळी आवरायला एक तास जास्तिचा मिळाला म्हणून आनंदीत व्हायचे तर १ तास कामावरुन उशीरा सुद्धा निघावे लागते.हे म्हणजे बुधवारला उगीचच रविवार म्हणण्याची टूम काढल्यासारखे झाले. रविवार म्हणालो तरी आहे तो बुधवारच ना आणि काम तितकेच करायला लागणारना मग हा मुर्खपणा कशासाठी? आणि त्यातही गोंधळात भर म्हणजे अमेरिकेतील २-३ (अतीशहाण्या) राज्यांना 'डे लाईट सेव्हिंग' नामंजूर असते. म्हणजे आधीच एका देशात ४ वेगळ्या वेळा आहेत त्यात ह्या दोघांची भर म्हणजे एकाच देशात तुम्ही कुठल्या राज्यात आहात ह्यावर तुमच्या ६ वेगवेगळ्या वेळा ठरतात. ह्यात मला सगळ्यात आश्चर्य वाटते ते विमान कंपन्यांचे. आपल्या कडच्या एष्टी स्टँडासारखी भराभर वेगवेगळ्या गावाला विमाने सोडताना कुठल्या गावात कुठली वेळ आहे त्याप्रमाणे नियोजन करताना त्यांच्या नाकी नऊ येत असतील.

सगळ्यात पहिल्या वर्षी इकडे आल्यावर ह्या डेलाईट सेव्हिंगची अंमळ गंमत वाटली होती. एक असाइनमेंट पूर्ण करुन ४.०० वाजता द्यायची होती. चिक्कार गडबड करुनही ४.००च्या आत काही ती पूर्ण झाली नाही तेव्हा आता काय असा प्रश्न पडला असताना अचानक मित्राने सांगीतले अरे हे काही ४.०० नाही वाजलेलेत ३.००च वाजलेत! पण ती गंमत तेवढीच नंतर नंतर मात्र जेव्हा ३.०० वाजताच बाहेर अंधार पडायला लागला ते बघून ह्या मूर्खपणाविषयी विचार करायचे सोडून दिले.

Thursday, October 30, 2008

लोकशाहीची कसोटी

चार नोव्हेंबर जसजसा जवळ येतो आहे तसतसे लोकशाहीचा कटोसीचा क्षण जवळ येतो आहे असे  म्हणण्यास वाव आहे. चार नोव्हेंबरला जगातील सर्वात महत्त्वाच्या निवडणुकीतील शेवटचे मत पेटीत बंद होणार आणि बुशचा वारसा कोण चालवणार ह्याचा एकदाचा निकाल लागणार आहे. अमेरिका तुम्हाला अवडो ना आवडो येउ घातलेली निवडणुक ही जगातील सर्वात मोठी निवडणुक आहे हे निर्विवाद. अमेरिका शिंकली की अवघ्या जगाला सर्दी होते हे सध्याच्या जगातील कोणत्याही शेअर निर्देशकाचे गेल्या १-२ आठवड्यातील आकडे पाहिल्यास दिसुन येईल.

लोकशाहीवर पद्धतीवर नेहमी होत असलेली टीका म्हणजे 'बहुमताला अक्कल नसते' हा (बहुतांशी लोकांचा?) समज. ह्या निवडणुकीत समोरा समोर उभे ठाकले आहेत ओबामा/बायडन आणि मकेन/पेलीन. ओबामा एकिकडे आपल्या वादविवाद आणि संभाषण कौशल्यातुन हार्वर्ड सारख्या विद्यापिठातुन घेतलेले शिक्षण सार्थ ठरवतो आहे तर दुसर्‍या बाजुला सेराह पेलिन बाई आपली बौद्धीक दिवाळखोरी ह्या ना त्या कारणाने प्रसार माध्यमांसमोर मांडत आहेत. त्यांचे यू ट्यूब वरील मुलाखतीवरील बरेचसे तुकडे पाहुन मला तरी काही महिन्यांपूर्वी नेटवर (अति)प्रसिद्ध झालेल्या मिस टीन साउथ कॅरोलायनाची आठवण होते. 

आता चार नोव्हेंबरला पाहुया बहुमत विजयाची माला सभाचतुर ओबामाला  घालते, की महान पेलीन बाईंना सोबत घेउन लढणार्‍या मकेनला. लोकशाहीची खरी कसोटी आहे खरी!       



तोपर्यंता पहा व्हिडिओ : सेराह पेलीन ह्यांचे अमेरिकेतील प्रमुख वर्तमान पत्रांविषयीचे ज्ञान.

Monday, October 27, 2008

कंपोजीट छायाचित्र : एक प्रयोग

कंपोजीट म्हणजे ज्यात दोन किंवा अधिक चित्रे एकत्र करुन एक वेगळाच परीणाम साधला जातो अशी चित्रे. इथे दिलेले हे चित्र म्हणजे दोन स्वतंत्र चित्रांचा मिलाफ आहे. भल्या पहाटे लास वेगस वरुन आमचे विमान डेनव्हरला जात असताना आकाशात सुंदर रंग बघायला मिळाले आणि त्याची छबी खिडकीतुन टिपली. ह्या चित्रामध्ये आणखी नाट्यमयता येण्यासाठी एक चंद्राचा क्लोज-अप मिसळून टाकला.

हा प्रयोग कसा वाटला ते अवश्य कळवा!




Sunday, October 26, 2008

गिली आणि ब्लास्फेमी


 


जगभरातील सर्व क्रिकेट रसिकांचा लाडका गिली आत्मचरीत्र लिहुन निदान भारतीयांच्या मनातुन तरी उतरतोय. कारण? अर्थातच क्रिकेट मधील देवावर सचिन तेंडुलकरवर त्याने सोडलेले टिकास्त्र! गिलीने सचिनवर दोन आरोप उपस्थित केले आहेत. १) सचिन खोटारडा आहे (भज्जी प्रकरणात खोटी साक्ष) २) सचिन घमेंडी खेळाडू आहे. पैकी दुसर्‍या आरोपाता काहीच तथ्य नाही. क्रिकेट मध्ये घमेंड  (करत असेल तर) करण्याचे निर्विवाद लायसन्स सचिनला आहे. एकहाती जॉ माणूस इतिहास घडवू शकतो त्याच्या बाबतीत घमंड वगैरे शब्द अस्तित्वात नाहीत, आहे तो  नुसता इतरांचा जळफळाट! 


असो.. पण त्याच वेळेला गिलीच्या पहिल्या आरोपात मात्र मला तथ्य वाटते. भज्जीचे आतापर्यंतचे एकूणच वर्तन बघता त्याने सिमंड्सला मैदानावर वांशीक शिवीगाळ केली हे नक्की! काही फुटांवर असणार्‍या सचिनने ते ऐकले हे ही नक्की! आपण जर खरी साक्ष दिली तर (आपला मित्र) भज्जीची कारकिर्द संपृष्टात येईल ह्या भीतीने सचिनने साक्ष फिरवली.

काहींच्या मते सचिनचे हे मित्रप्रेम असेल,एक उत्तम खेळाडू संघातुन हाकलला जाऊ नये ही संघवृत्ती असेल आणि त्यामूळे केलेले वर्तन बरोबर वाटत असेल. परंतु हे प्रकरणा हाताळताना सचिनने जे काही केले तो अप्रामाणिकपणाच. समजा उद्या रिकी पाँटींग किंवा एखाद्या गोर्‍या खेळाडूने भारतीय खेळाडूंना उद्देशुन वांशीक शेरेबाजी केली आणि त्याला वाचवायला त्यांच्याच संघातील दुसर्‍या एखाद्या खेळाडूने त्याची पाठराखण केली तर आपली प्रतिक्रिया काय असेल? आणि तीच प्रतिकिया जर आता इतर देशातील खेळाडूंची सचिन विषयी असेल तर मलातरी त्यात काही गैर वाटत नाही.       

Wednesday, May 14, 2008

नायाग्रा चित्रदर्शन

अमेरिकेला जाणार्‍या भारतियांना सगळ्यात मोठे आकर्षण असते ते नायाग्रा धबधबा बघण्याचे आणि त्यामुळेच कधीही इथे गेले तरी भारतीय लोकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. (ह्याचा फायदा असा की इथे अगदी ढाब्या पासून गाड्यांपर्यंत भारतीय खाण्याची रेलचेल असते. :-) ) मागच्या वर्षी ह्याच सुमारास नायाग्राला भेट देऊन आलो होतो. अमेरिका आणि कॅनडा अश्या दोन देशांच्या सिमेवर बसलेला हा प्रचंड धबधबा. व्हिसाच्या कटकटी मूळे त्यावेळेस फक्त अमेरिकेच्या बाजुने जेवढे बघता आले तेवढे बघीतले ह्यावर्षी योगायोगाने बरोबर त्याच सुमारास कॅनडातील टोरांटोला गेल्याने कॅनडाच्या बाजूने हा धबधबा पहायला मिळाले.

कॅनडाच्या बाजूने धबधबा अधिक सुंदर दिसतो असे बरेच ऐकून असल्याने खूप आशा ठेवून भाड्याने गाडी घेऊन २ तास ड्राइव्ह करुन दर्शनाला गेलो..पण हाय त्या दिवशी नेमका इतका पाऊस पडला की ढगाळ वातावरणातुन आणि गडद धुक्यातुन मनसोक्त दर्शन घेता आले नाही. तरीही अधुन मधुन थोडेसे उघडलेले पाहून काही प्रकाश चित्रे टिपली ती इथे चिकटवत आहे.















Monday, March 17, 2008

जोधा अकबर

आशुतोष गोवारिकरचा हा भव्य दिव्य वादग्रस्त चित्रपट एकदाचा पाहायला मिळाला. भारतात हा चित्रपट बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर का उतरले आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. इतिहास वगैरे मारो गोली पण आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा त्या बदल्यात पदरात असले काही पडणार असेल तर लोकं रस्त्यावर येणारच. असो.. तर हा भव्य दिव्य चित्रपट सुरू होतो अमिताभ बच्चन ह्यांच्या खर्जातल्या आवाजाने. मुघल भारतात कसे आले इथपासून ते छोटा अकबर पानिपतावर कसा पोहोचला इथपर्यंत त्यांचा आवाज आपली सोबत करतो. पानिपतात मुघल सैन्याने हिंदू राजाला छोट्या अकबरा समोर पेश केले असता अकबर त्याला मारत नाही. 'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हा चित्रपट ८०%च इतिहासावर असून २०% गोवारिकरांचे स्वप्न रंजन आहे हे तुम्हाला माहीत नाही का?)

नंतर थोड्या लढाया स्पेशल इफेक्ट वगैरे झाले की कथा वळते राजपूत राज घराण्यांकडे. इथे आमेर नावाच्या संस्थानात एक वेडसर राजा असतो. त्याची मुलगी म्हणजे जोधा (ऐश्वर्या राय-बच्चन) जी फावल्या वेळात आपल्या भावाशी ढाल तलवार वगैरे (एकदम रजपूत ष्टाईल) खेळत असते. तर हा राजा लवकरच आपला वारीस जाहीर करणार असतो आणि जोधाला आपला ढाल तलवारवाला भाऊ नॉमिनेशन जिंकणार अशी खात्री असते. शेवटी दसर्‍याच्या दिवशी हा राजा (अर्थातच वेडसर असल्याने) दुसर्‍याच कुणाची तरी निवड वारस म्हणून करतो आणि आपल्या जोधाचा विवाह देखिल तिच्या बालपणीच ठरलेल्या राजकुमाराशी जाहीर करून टाकतो. इकडे सत्ता आपल्याला मिळत नाही म्हणून हा चिडलेला भाऊ राजाच्या विरोधात कट शिजवू लागतो. हे पाहून राजाची मात्र चांगलीच टरकते आणि तो सरळ जाऊन मुघलांशी हातमिळवणी करायचे ठरवतो आणि कहानीमे ट्वीस्ट इथे येतो.

मुघलांना मी माझे राज्य अर्पण करेन पण त्यांच्या बादशहाने माझ्या मुलीला देखिल त्याच्या जनानखान्यात भरती केले पाहिजे अशी 'अट' (जोधाला न विचारताच) परस्पर घालून टाकतो. आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. शेवटी थोडेसे आढेवेढे घेतल्यावर अकबर ऑफर एकदाचा कबूल करतो. परंतु आता जोधा मात्र ह्या प्रकाराने वैतागलेली असते.. ती म्हणते माझ्या मना विरुद्ध लग्न ठरवताय? काही हरकत नाही! पण माझ्या सुद्धा दोन अटी आहेत. आता हा राजा, लग्न ठरवताना मुलीला कसलेही मत विचारत नाही पण ह्या अटींचे प्रकरण मात्र एकदम मान्य करतो... का? अहो शेवटी वेडसरंच ना तो! तर ह्या अटी ती फक्त अकबरालाच सांगणार म्हणे बाकी कूण्णालाही नाही असा क्लॉज देखिल असतो..झाले सगळे पुन्हा एकदम टेन्शन मध्ये.. एकदम सीरियस म्युझिक. शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना? असा एक अविचार मनात डोकावून जातो. पण नाही जोधाच्या दोन शुल्लक अटी अकबर कबूल करतो आणि धूमधडाक्यात लगीन लावून तिला घेऊन जातो.

इथं एक 'ख्वाजा मेरे ख्वाजा' नावाचे गाणे येते त्याच्या शेवटी ह्रीतीकने केलेला नाच अगदी बघण्यासारखा आहे. त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत (दुवा बघुन खात्री करा!). पांढरे वेष घातलेल्या जपानी रेस्टॉरंटातल्या आचार्‍यां सारख्या दिसणार्‍या कलाकारांनी केलेली कवायत देखिल पहाण्या सारखी आहे. (तुमच्या संगणकाचा आवाज बंद करुन एकदा ही कवायत बघाच!) इथून पुढे मात्र गोवारीकरांनी दिग्दर्शन एकता कपूरच्या कुशल नेतृत्वाकडे सोपावाले आहे. प्रेम करणारा पती कजाग नसणारी सासू असे सगळे असूनही एकता कपूरने तिचे टॅलंट दाखवले आहे अकबराच्या दाईचे पात्र रंगवण्यात. अकबराचा सांभाळ आईपेक्षा म्हणे ह्या दाईनेच केलेला असतो. आणि सासू मवाळ असली तरी ही उपसासू मात्र महा कजाग असते. त्यांतून एक समज गैर समजांची मानवी नाते संबंध दाखवणारी घरेलू घर घर की कहानी सुरू होते जी पडद्यावरच बघावी..कारण मी तो पर्यंत झोपून गेलो होतो आणि मधून मधून 'किती घोरतोयस?' असं बायकोच्या आवाजात कुणीतरी म्हणत असल्याच पुसटसं आठवतंय! शेवटी काहीतरी ढढँ ढढँ वाजते आणि चित्रपट एकदाचा संपतो इतकेच आठवते आहे!!

Tuesday, January 8, 2008

कॉल ऑफ ड्यूटी : मॉडर्न वॉरफेअर



हॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांना मागे टाकणारे आजकालचे कम्प्युटर/एक्स् बॉक्स/ पी एस् टू खेळ बघितले, की हा करमणुकीचा विभाग आता 'पोरखेळ' राहिलेला नाही ह्याची प्रचिती येते. चित्रपट माध्यम कितीही करमणूक प्रधान असलं तरी प्रेक्षक हे प्रेक्षकावस्थेतच त्याची मजा लुटू शकतात. संगणकीय खेळांमध्ये मात्र कथानकाचे तुम्हीच नायक आणि तुमच्या इशर्‍यावर सगळ्या घटना घडतात. ही मूलभूत संकल्पनाच ह्या खेळांच्या निर्विवाद यशामध्ये आहे. तसेच एखादा चित्रपट तुमची फार फार तर २-३ तास करमणूक करू शकतो पण हे संगणकीय खेळ मात्र कितीतरी अधिक पटीने (कधी कधी ६० ते ७० देखिल) तासांचे मनोरंजन घेऊन येतात. अर्थातच त्यांमुळे कितीतरी घरांमध्ये आजकाल लहान मुलांपेक्षा त्यांचे आईवडीलच एक्स बॉक्स/निटेंडो ह्यांची मजा लुटताना दिसतात. 'इलेक्ट्रिनिक आर्टस्' 'ऍक्टीव्हिजन' वगैरे स्टुडीओजना युनिव्हर्सल, वॉर्नर ब्रदर्स अश्या प्रथितयश हॉलिवूडच्या स्टुडिओंइतकेच वलय लाभले आहे.

कॉल ऑफ ड्यूटी : मॉडर्न वॉरफेअर हा संगणकीय खेळ ऍक्टीव्हीजन ह्या स्टुडिओची चौथी आवृत्ती आहे. आता पर्यंतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये दुसर्‍या महायुद्धाची पार्श्वभूमी होती . ह्या नव्या आवृत्तीत मात्र समावेश केला आहे आधुनिक जगतातील युद्धांचा. युद्धस्य कथा रम्य!! थरार साहस वीररस असल्या गोष्टी ठासून भरलेल्या असल्याने युद्धाशी निगडित कथा/ चित्रपट आपण नेहमीच आवडीने पाहतो. मॉडर्न वॉरफेअरच्या मनोरंजनाचे रहस्य देखिल हेच आहे. तीन अंकांमध्ये विभागलेले कथानक हे पूर्णपणे काल्पनिक असले तरी अतिशय वेगवान आहे. पहिला अंक इराक सदृश काल्पनिक देशात घडतो जिथे तुम्ही अमेरिकेच्या मरीन्स शाखेमध्ये भरती होऊन जाता. दुसर्‍या अंकात पूर्व युरोप मधील काल्पनिक मिशन्स मध्ये ब्रिटनच्या स्आस् चे प्रतिनिधित्व करता. दोन्ही अंकांचा शेवट तिसर्‍या अंकात होतो. तिनंही अंकामध्ये थरार वीररस साहस ठासून भरले आहे. जमिनीवरून शत्रूशी लढाई, लपून केलेला गनिमी कावा, विमानातून बॉम्बींग हे सगळे भरपूर अनुभवायला मिळते. निरनिराळ्या बंदुका, रणगाडे, विमाने,ग्रेनेड्स हे मनसोक्त हाताळायला मिळते. डिजीटल तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे ग्राफिक्स इतके वास्तवदर्शी झाले आहे की बर्‍याच प्रसंगांमध्ये ते रोमांच उभे करते. त्याचबरोबर नेमके पार्श्वसंगीत आणि अल्फा चार्ली टँगो असल्या भाषेत चालणारे संभाषण ह्या दोन गोष्टी वातावरण निर्मिती इतकी अचूक तयार करतात की खेळताना आपण पूर्णपणे गुंगून जातो.

हे सगळे व्यवस्थित चालण्यासाठी तुमचा संगणक मात्र चांगलाच ताकदीचा असला पाहिजे. बर्‍यापैकी नवा प्रोसेसर, २ जी बी रॅम आणि जी फोर्स ७६०० ला समांतर तोडीचा ग्राफिक्स प्रोसेसर कमीत कमी असला पाहिजे. इतकी सामुग्री जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला ह्या मॉडर्न वॉरफेअर चा अप्रतिम अनुभव घेता येईल.

Tuesday, October 23, 2007

बुद्धीबळ आणि अंतरराष्ट्रीय राजकारण

ह्या आठवड्याच्या टाइमह्या नियतकालिकामध्ये इराणचे अध्यक्ष अहमदेनिजाद आनि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ह्या दोघांचा एकत्र अर्धंपान भरुन छापलेला फोटो बघितला आणि काळजात चर्र झाले. अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती. सोळाव्या शतकातली विचारसरणी असणारा अहमदेनीजाद आणि रशियात येन केन प्रकारे आपली सत्ता अबाधीत ठेवणारा पुतिन ह्या दोघांची युती ही भरकटलेल्या अमेरिकन नेतृत्वाची परिणीती आहे. पण रशियासारख्या एकेकाळी जरी महासत्ता असणार्‍या पण सध्या तरी एक दरिद्री राष्ट्र म्हणून ओळख असणार्‍या राष्ट्राच्या इराण युतीची जगाने पर्वा का करावी? त्यासाठी इथे थोडासा जागतिक इतिहासातील संदर्भ देतो.

सध्याच्या जगातील सगळ्यात ज्वलंत आणि संवेदनशील भाग म्हणजे कोणता? असे विचारले तर ह्याचे उत्तर कोणेही देईल 'मध्य पूर्वेतील देश'. 'कोणत्याही प्रश्नांवर बेसुमार कत्तली हा एकमेव उपाय आहे' ह्या विचारसरणीवर आधारलेल्या अनेक अतिरेकी संघटना ह्याच भागात आपली मुळे घट्ट रोवुन आहेत. परंतु ह्या सगळ्यांच्यातील पाशवीपणाला वाट करुन देण्यासाठी त्याना सशत्र करत आहे रशिया आणि त्यातुन फुटलेली राष्ट्रे.साधारण नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला रेगनच्या नेतृत्वाखाली संपत आलेले शीतयुद्ध अखेर सिनियर बुश साहेबाच्या करकिर्दित एकदाचे संपले आणि जगाने तिसरे महायुद्ध टळले असा सुस्कारा टाकला. पण ह्या शीतयुद्धामध्ये रेगनने वापरलेली एक क्लुप्ती म्हणजे रशियाशी केलेली शस्त्रास्त्र स्पर्धा असे मानले जाते. आधिच डबघाईला आलेला रशिया ह्या शस्त्रांस्त्रांच्या शर्यतीत पार कंगाल झाला आणि शेवटी अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे मोडकळीस आला. अनेक वर्षंचे शीतयुद्ध जरी संपले तरी त्याने मागे ठेवली ती रशिया आणि त्यातून फुटलेली कंगाल राष्ट्रे, ज्यांच्याकडे खाण्या पिण्याची मारामार होती पण त्याचबरोबर कधिही न वापरलेल्या कोर्‍या करकरीत आधुनिक शश्त्रास्त्रांचे ढिगारे गंजत पडले होते. प्रत्यक्ष युद्ध तर कधी खेळलेच गेले नाही मग काय झाले ह्या प्रचंड शस्त्रसाठ्याचे?


शीतयुद्धांनंतर शस्त्रांची ही प्रचंड कोठारे उघडली गेली आणि हेजबुल्ला ते अल कायदापासुन सुदान आणि लायबेरिया पर्यंत ५ ते ९५ वर्षां पर्यंतच्या सर्वांच्या हातात ह्या बंदुका पोहचु लागल्या. आज जगभरात जवळपास प्रत्येक अतिरेक्याच्या हातात दिसणारी ऑटोमेटीक कलाशीनिकव्ह (ए के ४७/५६) ही बंदुक रशीयन बनावटीची आहे. (आपला संजय दत्त ज्यासाठी आयुष्यभरसाठी गोत्यात आला ती देखिल हीच बंदुक) बंदुका, तोफा, इतकेच काय लढाऊ विमाने आणि हॅलीकॉप्टर पासून विध्वंसक क्षेपणास्त्रापर्यंत कुणालाही, कुठेही रशियातुन पोहिचवले जाते. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीतुन कल्पना येईल की इराण आणि रशिया ह्यांची युती इतकी धोकादायक का आहे ते. इराणला न्युक्लिअर रिऍक्टअर्स खरेदी करायचे आहेत आणि पुतिन तो सौदा लवकरात लवकरात करून कमाई करण्याच्या तयारीला लागला आहे.अर्थातच, जिथले नेतृत्व अतिरेकी संघटनांच्या पाठींब्यावर ठरते अश्या देशांच्या हातात अणुबाँब देणे म्हणजे अवघ्या जगावर संकट ओढावून घेण्यासारखे आहे.


इतके सगळे निराशाजनक लिहिल्यावर ह्या काळ्या ढगाला चंदेरी किनार लावण्यासाठी एक आशाजनक घडामोड देखिल देतो. रशियात ही सगळी अंदाधुंदी जरी माजली असली तरी त्यातूनच पुढे येत आहेत गॅरी कास्पारोव्ह सारखे बुद्धिजीवी नेतॄत्व. होय हाच तो बुद्धिबळाचा बादशहा ग्रँडमास्टर कास्पारोव्ह. ह्या नावाने एकेकाळी बुद्धिबळात निर्माण केलेला दबदबा त्यामागील बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासा पुरेसा आहे. हाच कास्पारोव्ह आता पुतिन राजवटीच्या दंडुकशाहीसमोर दंड थोपटून उभारला आहे. गेल्या एक दोन आठवड्यातील अमेरिकन कार्यक्रमांमध्ये त्याची मुलाखत पाहिल्यावर त्याच्या हुशारीची चुणुक दिसुन आली. राजकारण आणि राजकारणी असे म्हंटल्यावर आपल्या मनात जे एक चित्र उभारते त्याच्या बरोबर उलट चित्र कास्पारोव्हच्या मुलाखतींमधून दिसले. रशियात लोकशाही आणण्यासाठी कास्पारोव्ह आणि त्याचे समर्थक अक्षरशः जीव धोक्यात घालत आहेत.

कास्पारोव्हच्या अमेरिकन टी.व्ही. वरील मुलाखतीमध्ये उत्तरे देताना अनेक ठीकाणी त्याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दीली. लोकाशाही आणायाचा कितीही प्रयत्न केला तरी रशियातील मने कधीही लोकशाहीचा स्विकार करणार नाहीत हे विधान खोडून काढताना त्याने उत्तर आणि दक्षिण कोरिया, तसेच तैवान आणि पश्चिम पूर्व जर्मनीची उदाहरणे देऊन आपली ह्या विषयवारील पकड दाखवली. उत्तर कोरिया आणि दक्षीण कोरिया दोन्ही देशातील लोक हे एकच असले तरी उत्तर कोरिया हा कट्टर साम्यवादामुळे मागासलेला देश तर दक्षिण कोरिया हा लोकशाही आणि खुली अर्थव्यवस्था असणारा प्रगत देश आहे. लोकांची मने एखादी व्यवस्था कधीही स्विकारू शकणार नाहीत हे विधान किती तकलादू आहे हे त्यातुन दिसून येते. त्याचबरोबर अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली दादगिरी लोकशाहीला बदनाम करत आहे असे देखिल कास्पारोव्हने नमूद केले.

मंडळी, रशिया म्हणजे काही कॅलीफोर्निया नव्हे. आपल्या शत्रुंना जेवणात विष घालून मारणार्‍या कुटील पुतिनसमोर बुद्धीजीवी कास्पारोव्ह किती टिकणार हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. पण असं झाल्यास संपुर्ण जगाच्या दॄष्टीने ती आनंदाची बातमी ठरेल ह्याची मला तरी खात्री असल्याने कास्परोव्हला शुभेच्छा देऊन हा लेख संपवतो.

Wednesday, October 3, 2007

कूल इट - बियॉन लॉमबोर्ग



सध्या वैश्विक तापवृद्धी हा बरेच चर्चेत असणारा विषय आहे. ह्यावर चाललेल्या वाद विवादांमध्ये साधारणपणे दोन गट असतात. एक म्हणजे बहुतांश शास्त्रज्ञांचा गट ज्यांच्या मते वैश्चिक तापवृद्धी ही मोठी समस्या आहे तर दुसरा गट आहे वैश्विक तापवृद्धी ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे आणि त्याचे उगीचच स्तोम मानवले आहे असे मानणार्‍यांचा. ध्रुवीय बर्फ वितळत आहे, समुद्राचे पाणी अधिक ऍसिडीक बनत चालले असून काही दुर्मिळ प्रवाळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, ह्या गोष्टी आता सिद्ध झाल्या आहेत त्यामूळे मी ह्या वाद विवादामध्ये मला पहिल्या गटात समजतो. पण नुकतेच टी.व्ही. वरील एका कर्यक्रमात बियॉन लॉमबर्ग ह्या अर्थशास्त्रज्ञाची मुलाखत पाहीली आणि एक वेगळाच दृष्टीकोन आणि विचार ऐकायला मिळाले जे मुलाखतकाराला पटले नसले तरी मला मात्र पटले.

असे काय आहेत लॉमबर्ग ह्यांचे विचार?

लॉमबर्ग ह्यांनी हे सगळे विचार 'कूल ईट' ह्या पुस्तकात सविस्तर मांडले आहेत मी ते पुस्तक वाचलेले नसले तरी वर उल्लेखलेल्या मुलाखतीतुन मला कळलेले त्यांचे विचार येथे देतो :-

वैश्विक तापवृद्धी ही समस्या आहे ह्याचा नकार त्यांनी केलेला नाही. पण ही समस्या सोडवण्यासाठी सध्या जो अतिरेक केला जातो आहे तो त्यांच्या मते चुकिचा आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी मांडलेला 'क्योटो प्रोटॉकॉल' हा अंमलात आणण्यासाठी अतिशय खर्चिक आहे. त्यावर पैसा खर्च करण्याऐवजी पर्यायी इंधनाचे स्रोत (उदा. सूर्य उर्जा) हे अश्म इंधनाला स्पर्धा करू शकतील अश्या स्वस्त दरात उपलब्ध होण्यासाठी त्यावरील संशोधनावर करणे जास्त गरजेचे आहे. कारण कार्बन इमिशन मध्ये सध्या आघाडीवर असणारे देश म्हणजे चीन आणि भारत आहेत आणि ही दोनही राष्ट्रे विकसनशील आणि आर्थिक दृष्ट्या विकसीत देशांपेक्षा मागे आहेत. त्यामुळे कॅलीफॉरनियातील निवडक श्रीमंत लोकांनी सोलर पॅनेल बसवून त्याचा फायदा काहीच होणार नाही . जाणवण्या इतपत बदल तेव्हाच घडून येईल जेव्हा भारत आणि चीन मधील सामन्य माणूस ह्यांचा वापर करू लागेल. आणि हे तेव्हाच शक्य होइल जेव्हा पर्यायी इंधनचा उपाय हा अश्म इंधना इतकाच अथवा त्याहुन अधिक किफायतशीर असेल.

तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का?

मंडळी मलातर बॉ ह्या लॉमबर्ग साहेबाचे विचार पटले. आपल्याला काय वाटते?

Sunday, September 30, 2007

मुक्काम पोष्ट बेजींग

शिकागो एअरपोर्टचे युनायटेड एअरलाइन्सचे टर्मिनल. आम्हा पाच जणांचा कंपू बेजींगच्या नॉनस्टॉप फ्लाइटच्या प्रतीक्षेत. इतक्यात सर्व प्रवाश्यांना रांगेत उभे करून त्यांच्या व्हिसाची तपासणी सुरू केली. काय कटकट आहे असे म्हणत आम्ही देखिल त्या लांबलचक रांगेत उभे राहिलो आणि आमचा नंबर आला तेव्हा काय आश्चर्य इकॉनॉमी क्लासच्या ५ सिटा मोकळ्या करण्यासाठी आम्हाला बाजुला घेऊन तिथल्या तरुणीने चक्क ५ बिजनेस क्लासचे बोर्डिंग पास बनवुन दिले. साडे बारा तासांची नॉन स्टॉप फ्लाइट आणि आम्हाला बिजनेस क्लास काय सांगता.. एखाद्या पावसाळी दिवशी शाळेच्या पटांगणातच, 'अमुक तमुक ह्यांचे ९२व्या वर्षी निधन झाल्याने आज शाळा भरणार नाही' अशी 'सुचना' दिल्यावर आमच्या मनाची जी स्थिती व्हायची अगदी तशीच स्थिती पुन्हा एकद झाली आणि अगदी बिजनेस क्लास मधले सराइत प्रवासी असल्यासारखे त्या गुबगुबीत प्रशस्त खुर्च्यांवर रेलून, उंची मद्यांचा आस्वाद घेत आम्ही आमच्या प्रवासाला सुरूवात केली.


मिठाईवाला
सुरूवात इतकी छान होणे ही पुढच्या आठवड्याभराच्या मस्त प्रवासाची नांदीच होती. चीनला जायचे ह्या नुसत्या कल्पनेनेच आम्हाला गेले काही महिने रोमांच आले होते. लाल गजांच्या मागे काय चालले आहे हे डोकावुन बघायची प्रचंड उत्सुकता लागली होती. बेजींगच्या 'कॅपीटल' विमानतळावर भर दुपारी आमचे आगमन झाले. इमिग्रेशन कस्टम हे सगळे सोपस्कार पार पाडत शेवटी एकदाचे आमच्या हॉटेल वर येउन ब्यागा आपटल्या. अंघोळी वगैरे उरकेपर्यंत संध्याकाळ झाली आणि आम्ही जेवणाची सोय करण्यासाठी बाहेर पडलो. आजूबाजूला बघितल्यावर लक्षात येते होते की, जगभर 'मेड इन चायना' गोष्टी विकुन ह्या चिन्यांनी एकंदरीय बरीच माया गोळा केली आहे. कोणत्याही अमेरिकेतल्या शहरात दिसतील अश्या गाड्यांनी भरलेल्ले आणि खड्डे विरहीत रस्ते. एकमेकावरुन जाणरे फ्लायओव्हरस उंच उंच इमारती आणि त्यांच्यावरची नाविन्यपूर्ण रोषणाइ आणि नुसता झगमगाट, च्यामारी एकेकाळी कदाचित आपल्या पेक्षा दरिद्री असलेल्या ह्या देशात फिरताना पण आता 'फारिन' ला आल्यासारखेच वाटत होते. आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे इथल्या सिटी बसेस. रस्त्याच्या दोन्ही बाजुला असणाऱ्या विजेच्या तारांना लटकत जाणाऱ्या ह्या बसेस बघून आपल्याकडं पण ही इंधन वाचवणारी आणि प्रदुषणमुक्त युक्ति अवलंबली पाहिजे असे वाटले.

बांबुच्या वाडग्यातुन खाताना..
शेवटी एका उपाहारगृहा समोर बरीच गर्दी बघून आम्हीही पोटपुजेसाठी घुसलो. आत जाऊन टेबल पकडले खरे पण आता ऑर्डर का करायचे? तिथल्या एकालाही इंग्रजी समजत नव्हते आणि आम्हाला चयानीजचा गंध नव्हता. मेन्यू कार्डातील रँडमली काहीतरी ऑर्डर करायचे आणि अनेक ऐकीव कथां मधल्यासारखे पानात 'भरले मांजर' अथवा 'पीठ पेरलेली डासांची अंडी' असले काहीतरी पडायचे ही भिती!!! तसे रस्त्यावरती ठेल्यांवर विंचू, कसले कसले किडे काडीला लावून विकायला ठेवलेले पाहिलेच होते! कसेबसे बाकीच्यांचा टेबलाकडे बोटे दाखवून बियर तेवढी मागवता आली पण खाण्याचे काय? शेवटी आमची कुचंबणा बघून तिथल्या म्यानेजराने एक पाच-दहा इंग्रजी शब्द समजणारा वेटर धाडून दिला आणि आम्ही चिकन/लँब असे शब्द असणारे पदार्थ मागवण्यात यशस्वी झालो. हे हॉटेल प्रसिद्ध होते ते 'हॉट पॉट' नावाच्या प्रकारासाठी. हा हॉट पॉट म्हणजे टेबलाच्या मध्यभागी गरम पाण्याची एक परात आपल्या टेबलावर उकळत ठेवतात आणि कच्चे मांस/ भाज्या समोर आणून ठेवतात हे कच्चे मास आणि भाज्या त्या पाण्यात थोडावेळ बुडवुन ठेवायच्या आणि खायच्या. आमच्या अमेरिकन सहकाऱ्यांनी लगेच हा प्रकार ऑर्डर केला तरी मला मात्रा काही फारसा झेपला नाही त्यामूले मी आपलं सरळ भरपूर शेंगदाणे घालून केलेला चिकनवर ताव मारल आणि होटेलवर येउन ताणून दिली.
ताजे ताजे विंचू


एंप्रेस गार्डन
दुसऱ्या दिवशी आम्हाला विशेष काही काम नसल्याने आम्ही निघालो बेजींग़ भटकायला. बेजींग शहर हे कांद्या सारखे पापुद्रयांनि बनले आहे. अतिभव्य तिआन्नमेन चौक हा त्याच्या मध्याभगी असून त्याच्या भोवतीचे पापुद्रे म्हणजे अनेक वर्तुळाकार 'रिंगरोड' आहेत. आमच्या सुदैवाने आमचे होटेल हे अगदी तिआन्नमेन चौका पासून पायी जाण्याच्या अंतरावर होते. तेव्हा सर्वप्रथम भेट दिली ती ह्या तिआन्नामेन स्क्वेअरला. ह्या चौकात पोहचलो आणि 'चौक' म्हणजे आमच्या मनात जे चित्र उभे राहते त्याला पार उध्वस्त करुन टाकले. अक्षरशः दोन तीन क्रिकेट ग्राउंड उभी रहातील इतकी ह्या चौकाची व्याप्ती. चहुबाजुंनी रस्ते आणि मधोमध हा अतिविशाल चौक. ह्याच्या तीन्ही बाजुला पार्लमेंट,लष्कर मुख्यालय अश्या शासकीय ईमारती तर चौथ्या बाजूला उत्तरेकडे भव्य 'फॉरबिडन सिटी'.

फॉरबिडन सिटी
तिआन्नमेन स्क्वेअरची भव्यता कितीही भारावून टाकत असली तरी ह्याच जागेवर झालेली मानवी हक्कांची अमानुष पायमल्ली आणी प्रसंगी अंगावरून रणगाडे चालवून मोडलेल्या तरुण आणि बुद्धीजीवींच्या बंडा अश्या कटू स्मृती देखिल ह्याच ठिकानाशी निगडीत आहेत. आम्हा गळ्यात कॅमेरे लटकवलेल्या जत्थ्याचे मात्र पुढचे लक्ष्य होते 'फॉरबिडन सिटी'. तिआन्नमेन स्क्वेअर पाशीच एका वाटाड्याला पकडून आम्ही ६० युआन चे तिकिट काढून फॉरबिडन सिटी मध्ये घुसलो. इथली कोणतीही प्रेक्षणीय स्थळे पाहायला लागले सतत दोने नावे ऐकावी लागतात. चिंग डायनेस्टी आणि मिंग डायनेस्टी. ही इथली दोन अतिशय प्रसिद्ध राजघराणी. आमच्या वाटाड्याचे प्रत्येक वाक्य चिंग किंवा मिंग ह्या शब्दानेच सुरू व्हायचे. पहिल्या पहिल्यांदा आम्ही अगदी काटेकोर पणे चिंगांच्या राजाने काय केले मिंगांच्या राजाने काय केले असले ऐकून लक्षात ठेवायच प्रयत्न करायचो पण नुसत्या फॉरबिदन सिटीतच ५६ वेळा हा उल्लेख झाल्यावर मात्र आम्ही ह्या चंगू-मंगुचा नाद सोडून दिला. पण काहीही म्हणा शनवार वाड्यात फिरताना जे रोमांच उभे राहतात ते ह्या फॉरबिडन सिटीत नाय बॉ! लहानपणापासून शिकलेला इतिहास आणि वाटाड्याने अवघ्या काही मिनिटांपूर्वी सांगीतलेला इतिहास ह्यामूळे हा फरक पडत असावा. पण ह्या फॉरबिडन सिटीच्या मागे असलेली 'एंप्रेस गार्डन' मात्र भारी आहे हा. फंग शुई च्या सिद्धांताप्रमाने उत्तरेला टेकडी असली पाहीजे म्हणून फॉरबीडन सिटीच्या उत्तरेला देखिल एक मानव निर्मित चांगली पर्वती एवढी टेकडी बांधली आहे खूप इच्छा असून देखिल दिवसभराच्या पायपीटीने थकल्यामूळे ही टेकडी काही चढू शकलो नाह.

समर पॅलेस


टेंपल ऑफ हेवन
फॉरबिडन सिटी बरोबरच बेजींग़मध्ये आवर्जून बघण्यासारखी ठीकाणे म्हणजे 'ग्रेट वॉल', 'समर पॅलेस' आणि 'टेंपल ऑफ हेवन'. ग्रेटवॉल पहाण्यासाठी बादालींग नावाच्याअ गावाला जावे लागते. तिथे फारच (अजानुकर्ण टाईप) हौशी असाल तरच पायी चढून जावे अन्यथा डायरेक्ट भिंतीवर नेऊन बसवणारी केबल कार आहे. आम्ही अर्थातच ह्या रज्जुरथाचा वापर करून भिंतीवर गेलो. ग्रेट वॉल प्रमाणेच इतर प्रेक्षणीय स्थळांच्या ठीकाणी देखिल मुबलक प्रमाणात माहिती देणारे गाईड मिळतात. ह्या सगळ्या ठीकाणांची नावे असलेले कार्ड आमच्या होटेलवाल्याने आम्हाला दिले होते. टॅक्सीवाल्याशी एकही शब्द न बोलता नुसते ह्या कार्डावरील ठिकाणावर बोट दाखवून तो नेईल तीकडे सुटायचे हे तंत्र अवलंबत आठवड्यात प्रचंड भटकंती खादाडी आणि खरेदी केली. पर्ल मार्केट, सिल्क मार्केट इथले कुठच्या कुठे भाव पाडणारे विक्रेते बघून माझे भारतीय मन आश्चर्यचकित होत होते तर आमच्या सोबत असणाऱ्या अमेरिकन मंडळींची काय अवस्था होत असेल ह्याची तुम्हीच कल्पना करा. ४०० आणि ५०० युआनला सुऱू होणारी घासाघीस २०-३० युवानवर संपे. पुण्या मुंवईतल्या फॅशन स्ट्रीट्स वर अवगत केलेली माझी घासाघीशीची कला पाहून पाश्चात्य मंडळींनी तोंडात बोटे घालणेच बाकी राहीले होते. हातात एक आठवडाच असल्याने आणि त्यातच ज्या परिषदेसाठी गेलो होतो त्या परिषदेत देखिल हजेरी लावायची असल्याने बेजींग व्यतिरिक्त अन्य कोठे मात्र फिरू शकलो नाही. तर मंडळी हा आमचा बेजिंगच्या धावत्या भेटीचा वृत्तांत आमच्या विद्यापिठातील किस्श्याने संपवतो.
पर्ल मार्केट

ग्रेट वॉल


आमच्या विद्यापिठातील प्राध्यापकाशी गप्पा मारतना असंच एकदा चायनाचा विषय निघाल्यावर प्राध्यपकबुवांनी एक मजेदार किस्सा सांगीतला होता. त्यांच्या लहानपणी इथं अमेरिकेत कम्युनिझम हा वाईट असतो हे बिंबवताना चायना हा कम्युनिझमची राजवट असणारा देश म्हणजे म्हणजे अमेरिकेला किती मोठा धोका आहे असं ठसवलं जायचं. पण गंमत म्हणजे आता तिथला कम्युनिझम जेव्हा बाजारू तत्त्वांचा अवलंब करत आहे तेव्हा निर्माण झालेली भीती कितितरी अधिक प्रमाणात आहे अश्या गोष्टी हीच माणसे करू लागली आहेत. आणि खरंच हुकुमशाहीच्या बडग्यासमोर अस्ताव्यस्त पणे वाढत चाललेले इथले इंफ्रा स्ट्रक्चर बघून वारंवार त्याचात प्रत्यय आला.

Saturday, June 9, 2007

अमेरिकन हिस्ट्री एक्स


काही चित्रपट मनोरंजनाचा मसाला ठासून
भरलेले परंतू वास्तवाशी कसलीही सांगड न घालणारे बाजारू असतात तर काही वास्तववादी पण मनोरंजनाचा अभाव असणारे अत्यंत रुक्ष कंटाळवाणे असतात. मनोरंजन आणि वास्तव ह्या दोन्हीचा बॅलन्स साधणारे चित्रपट मात्र दुर्मिळच येतात आणि त्यामुळेच सर्वात जास्त आकर्षून घेतात. वास्तवाशी अतिशय प्रामाणिक असणारे परंतु त्याचबरोबर पकड घेणारे कथानक, नेमका अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन ह्यामुळे करमणूक मूल्य देखिल असणारे हे चित्रपट. ह्या विभागणीत बसणारा आणि माझ्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत खूप वरचे स्थान असणारा चित्रपट म्हणजे अमेरिकन हिस्ट्री एक्स. आपली विचारांची बैठक पुन्हा एकदा तपासून पाहायला लावणारा आणि तितकेच सुन्न देखिल करून जाणारा चित्रपट. तत्कालीन (काँटेंपररी)अमेरिकेचे अतिशय यथार्थ चित्रण ह्या चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटाचे कथानक हे 'डेरेक व्हिनयार्ड' ह्या मध्यवर्ती भूमिकेच्या अवती भवति फिरत राहते. ही भूमिका अविस्मरणीय केली आहे ती 'एडवर्ड नॉर्टन' ह्या हर हुन्नरी कलाकाराने.( काही वर्षांपूर्वी मी अक्षरशः निव्वळ एडवर्ड नॉर्टनची भूमिका आहे एवढ्या माहितीवर त्याचे जवळपास सगळे चित्रपट बघितले..) डेरेक हा एका कनिष्ठ मध्यमवर्गीय अमेरिकन घरातला अग्निशमन दलातल्या कर्मचाऱ्याचा मुलगा. जात्याच हुशार अभ्यासात देखिल चांगली प्रगती असणारा. बहीण भाऊ आई बाबा असे त्याचे छोटेसे कुटुंब.
चित्रपट सुरू होतो तो कृष्णधवल माध्यमातून उलगडणाऱ्या फ्लॅशबॅकने. भर रस्त्यावर दोन खून पाडल्यावर तुरुंगात शिक्षा भोगून शेवटी जामिनावर डेरेक घरी येत आहे. एका सामान्य मधमवर्गीय घरातील हुशार चुणचुणीत मुलाने तरुण वयात मात्र इतका भीषण गुन्हा का केला? ह्याचा शोध म्हणजे ह्या चित्रपटाचा पूर्वार्ध. भाषेवर उत्कृष्ट पकड असणारा आणि अभ्यासात देखिल बऱ्यापैकी गती असणारा डेरेक शाळेत देखिल मुख्याध्यापकांचा लाडका असतो. हाच डेरेक पुढे मात्र भरकटत जाऊन जातीयवादी आणि द्वेषमुलक संघटनेत सामील होऊन त्याच्या नेतृत्वापर्यंत कसा पोहोचतो हा प्रवास परिणामकारक केला आहेत कल्पक पात्र उभारणीने. डेरेकचे वडील, कृष्णवर्णीय मुख्याध्यापक डॉ‌. स्विनी, ज्यू शिक्षक मर्विन, जातीयवादी संघटनेचा नेता कॅमरन अलेक्झांडर, डेरेकचा भाऊ डॅनी ही सर्व पात्रे आणि त्यांचे कथानकाला आवश्यक बारकावे खूपच प्रभावीपणे मांडले आहेत. बराचसा चित्रपट उलगडत जातो तो डेरेकच्या भावच्या डॅनीच्या स्वगतातून. डॅनीला मुख्याध्यापकांनी 'त्याच्यावर त्याच्या भावाचा असणारा प्रभाव' ह्यावर पेपर लिहायला सांगितलेले असते आणि त्यासाठी लिखाण करताना डॅनीच्या समोर सगळा भूतकाळ उभा राहतो.
वर्णद्वेष हा अमेरिकेतील एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. त्यावर आजपर्यंत अनेक पुस्तके आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अमेरिकन हिस्ट्री एक्सच्या कथानकाचा गाभा देखिल वर्णद्वेषच आहे. मुख्याध्यापक स्विनींचा डेरेकवर खूप प्रभाव असला तरी त्याच्या मनावर खोल परिणाम होत असतो तो त्याच्या वडिलांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा.वडिलांनी सहज केलेली शेरेबाजी पौगंडावस्थेतल्या डेरेकची विचारसरणी बदलण्यास कशी कारणीभूत होते हे दाखवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. "पूर्वी नव्हते हो हे ऍफरमेटीव्ह ऍक्शनचे खूळ! लोकांना नोकऱ्या देताना फक्त त्यांच्या गुणात्मक अवलोकन केले जायचे त्यांना वंशावर आधारीत सूट मिळायची नाही आता मात्रा निव्वळ कृष्णवर्णीय असण्याच्या जोरावर लोकांना भरती केले जाते" ही डेरेकच्या वडिलांची तक्रार ऐकताना आजकाल आपल्याकडे देखिल घराघरामध्ये चालणारे संवाद आठवतात. अत्यंत सहज केलेली टिपणी कुणावर आणि कसा परिणाम करून जाईल हे सांगता येत नाही ह्याचे प्रत्यंतर येते. अशातच डेरेकच्या वडिलांचा मृत्यू ड्यूटीवर असताना एका कृष्णवर्णीय गुंडाकडून होतो आणि त्यामुळे डेरेकचे पूर्ण जीवन बदलते. दुःखाचे रुपांतर प्रचंड द्वेष आणि संताप ह्यात होण्यास वेळ लागत नाही. मेंदूचा ताबा संताप आणि राग ह्यांनी घेतलेला डेरेक कॅमरन अलेक्झांडर नावाचा वर्णद्वेषी आणि नाझीवादाचा पुरस्कार करणारी संघटना चालवणाऱ्या धूर्त माणसाच्या जाळ्यात सापडतो. अनेक उडाणटप्पू गोळा केलेल्या कॅमरनला डेरेकच्या रूपात एक नेता मिळतो. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर डेरेक देखिल चिल्लर गुंडगिरी करणाऱ्या ह्या उडाणटप्पूंच्या जमावाला संघटित करण्यास यशस्वी होतो. सर्वसामान्य डेरेक आता नेता झालेला असतो. वर्णाच्या आधारावर दहशत पसरवणे, गोरी कातडी हीच जगातील सगळ्यात श्रेष्ठ जमात बाकी सर्व वर्ण कनिष्ठ, असले प्रोपागांडा चालवणे जोरात चालू असते. अशातच डेरेकच्या घरी त्याच्या गाडीत चोरी करायला आलेले ३ भुरटे चोर डेरेकच्या तावडीत सापडल्यावर तो त्यातल्या दोघांची अत्यंत निर्घृण हत्या करतो. केलेल्या कृत्याचा कसलाही खेद अथवा पश्चात्तापाचा लवलेशही नसणारा डेरेक एखाद्या क्रांतिकारकाच्या थाटात स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करतो.
ह्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरुंगात रवानगी झाल्यावर मात्र डेरेकचे जीवनात आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला त्याला तुरुंगातही त्याच्याच संघटनेचे काही गोरे भेटल्याने तिथेही त्याला बाहेरच्या सारखेच वाटत असते परंतु लवकरच डेरेकच्या लक्षात वास्तव यायला लागते. तुरुंगाच्या बाहेरचे आणि आतले जीवन ह्यातला फरक कळू लागतो. बाहेरुन अंमली पदार्थ मिळावेत म्हणून खालच्या वर्णाच्या रखवालदारांशीही हात मिळवणी करणारे आणि त्यांना चिरीमिरी देणारे संघटनेचे लोक बघितल्यावर त्याला ह्या सगळ्यातला पोकळपणा लक्षात येऊ लागतो. राग आणि संतापाच्या भरात भरकटलेले त्याचे विचार मुळात बुद्धिवादी असलेले त्याचे मन मार्गावर आणू लागते. अर्थातच त्यामुळे त्याच्यात होणारे बदल सहकारी साथीदारांना मात्र आता खटकू त्याचा लागलेले असतात,आणि त्याला धडा शिकवण्यासाठी ते त्याच्यावर अनन्वित अत्याचार करतात. आपल्याच लोकांकडून मिळालेल्या ह्या वागणुकीने तुटायला आलेल्या डेरेकला तुरुंगात एकमेव सहारा राहिलेला असतो तो म्हणजे मुख्याध्यापक स्विनी. जगाने वाया गेलेला असे प्रमाण पत्र दिले असले तरी स्विनींचा मात्र आपल्या विद्यार्थ्यावर विश्वास असतो. खचलेल्या डेरेकला ते तुरुंगात भेटायला येतात. 'तू आतापर्यंर्त अस काहीही केलं आहेस का ज्यामुळे तुझं स्वतःचंच आयुष्य अधिक सुंदर झालं?' ह्या त्यांच्या एका प्रश्नानेच निगरगट्ट झालेला डेरेक ढसढसा रडू लागतो आणि पश्चात्तापाच्या भावनेने पोखरून निघतो. शेवटी पॅरोल वर सुटका झालेला आणि आतून बाहेरुन बदललेला डेरेक एडवर्ड नॉर्टनने अप्रतिम जमवला आहे. धाडसी आत्मविश्वास आणि बेफिकीर वृत्ती पासून एका प्रगल्भ आणि वास्तवाचे भान असणाऱ्याचा व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास खूपच छान रंगवला आहे. तुरुंगातून बाहेर पडता पडता का होईना योग्य मार्ग डेरेकला दिसला असला तरी तुरुंगात जाण्यापूर्वी त्याच्या पावलावर पाऊल ठेवणारा त्याचा लाडका डॅनी मात्र चांगलाच वाहवत चाललेला असतो. डेरेकमध्ये झालेला हा कायापालट डॅनीच्या आकलन शक्तीच्या मात्र बाहेर असते. इकडे कॅमरनने डॅनीला देखिल डेरेक सारखा नेता बनवणे सुरू केलेले असते. शाळकरी वयात माईनं कांफ वरती लेख लिहिणे, प्रचंड वर्णद्वेषी विधाने करणे ह्यामध्ये डॅनी रमलेला असतो. तुरुंगातून बाहेर पडलेल्या डेरेक समोर सगळ्यात मोठे आव्हान असते ते डॅनीला ह्या सगळ्यापासून परावृत्त करण्याचे. एका अंधाऱ्या रात्री रस्त्याच्या कडेला बसून डेरेक आपली सगळी कथा डॅनी समोर मांडतो. दोन भावांच्या संवादाचा हा हळुवार प्रसंग खूपच परिणामकारक झाला आहे. "सतत चीड, राग, द्वेष ह्याचा मला आता मनापासून कंटाळा आला आहे" ह्या डेरेकच्या शब्दातील तळमळ त्याच्या तुरुंगातील अनुभवातून विलक्षण परिणाम करून जाते. हिंसेच्या परिसीमा गाठल्यावर त्याचा उबग आल्याने संन्यास घेणारा सम्राट अशोक नकळत आठवून जातो. ह्यापुढील चित्रपट मात्र सुन्न करणारा आहे. शेवट मी इथं देणार नसलो तरी अतिशय दुःखांत आहे इतकेच नमूद करतो.

Thursday, May 31, 2007

रॉन पॉल २००८

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जरी २००८ मध्ये होणार असली तरी त्याची धूळवड मात्रा आता पासूनच सुरू झाली आहे. २४ तास वृत्तपत्र वाहिन्यांचे त्यांमुळे चांगलेच फावले असून सतत ह्या विषयावर काहीतरी काथ्याकूट कोणत्यातरी वाहिनीवर चालूच असतो. बुश साहेबांच्या करामतींमुळे आम जनताही त्रस्त असून त्याने ह्या कार्यक्रमांचे टीआरअपी वाढण्यास चांगलीच मदत होते. अमेरिकेत द्विपक्षीय पद्धती असल्याने इथल्या प्रमुख दोन पक्षांनी (रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटीक) आपापल्या पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आहे. ह्या इच्छुक उमेदवारांचे वाद विवाद सध्या इथल्या टी व्ही वर पाहायला मिळत आहेत. राजकारणी हे कोणत्याही देशाचे/पक्षाचे असले तरी राजकारणी हे राजकारणीच ह्याचा प्रत्यय यावा अश्या ह्या बाष्कळ चर्चा. तेच तेच वीट आणणारे मुद्दे,पोकळ आश्वासने , बढाया हे सगळे जोरात चालू आहे. डेमोक्रॅटसनि युद्ध कसे चुकीचे आहे म्हणून हंबरडा फोडायचा आणि रिपब्लिकन्सनी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असला भंपक युक्तिवाद करायचा हे सतत चालू आहे. आधी युद्धाच्या ठरावाला संमती देणारी आणि आता युद्धा विरुद्ध उर बडवणारी हिलरी काय आणि ९/११ रोजी योगायोगाने न्यूयॉर्क चा मेयर असण्याच्या एकमेव भांडवलावर उड्या मारणारा ज्युलिआनी काय सगळे एकाच माळेचे मणी वाटतात. अशा वातावरणात सध्या डॉ. रॉन पॉल हे नाव मात्र चांगलेच गाजत आहे.

रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे आणि टेक्सास मधील एक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे ७५ वय असलेले रॉन पॉल ह्यांनी चांगलीच खळबळ उडवली आहे. उमेदवारीच्या शर्यतीत बहुदा सर्वात शेवटी असूनही आणि रिपब्लिकन पार्टीच्या एकूण एक इच्छुक उमेदवारांशी मतभेद असतानाही रॉन पॉल आपल्या मतांशी खंबीर आहेत. ही मते त्यांनी जाहीरपणे रिपब्लिकन डिबेट मध्ये मांडून आपल्याच पक्षातील लोकांचा रोष ओढवला असला तरीही सामान्य जनतेची मात्र वाहवा मिळवली आहे. आपली मते अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि खंबिर पणे मांडणारा नेता आजकालच्या राजकारणात बघून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

काय मुद्दे आहेत रॉन पॉल ह्यांचे? सर्वप्रथम अमेरिकेला सध्या असलेली अतिरेक्यांची साडेसाती ही त्यांच्याच कर्माची फळे आहेत हे कटू सत्य त्यांनी जाहीरपणे मांडले आहे. १९५३ पासून अमेरिकेची अंतर राष्ट्रीय राजकारणातील ढवळाढवळ आता त्यांच्याच अंगलटी येत आहे. इराण मधील लोकशाही उलथवण्यास मदत करून तिथे घराणेशाही आणणे, ओसामा लादेन सारख्या अतिरेक्यास सामर्थ्यशाली बनवणे, आधी सद्दामाचा पाठिंबा आणि नंतर त्याच्यावरच हल्ला आणि फाशी असलं ह्या स्वार्थापोटी केलेल्या परंतु दूरदृष्टीचा अभावाने केलेल्या ह्या घोडचुका आता अमेरिकेला सतावत आहेत. इतर राजकारणी फक्त पृष्ठभागावर बुडबुडे आणणारी गुळमुळीत विधाने करत असताना रॉन पॉल ह्यांनी मात्रा खोलात हात घातला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांना देखिल खोटी नाटकी टीव टीव ऐकण्याची इतकी शिसारी आली आहे की कडू असले तरी मुद्द्यांना प्रामाणिक असणारे रॉन पॉल ह्यांचे विचार त्यांना अधिक आवडले आहेत.

रॉन पॉल ह्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी त्यांच्यांसमोर समस्या आहे ती लोकप्रियते बरोबरच सध्याच्या लोकशाहीत अत्यंत आवश्यक असणाऱ्या घटकाची म्हणजेच ' प्रचारासाठी आवश्यक पैशाची'. रॉन पॉल ह्यांचा पैसा उभारण्यामध्ये सध्यातरी सर्व उमेदवरात बहुदा शेवटचा क्रमांक लागतो. निव्वळ लोकप्रियतेच्या लाटेवर अवलंबून पैशाअभावी देखिल रॉन पॉल ह्यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळणार का? की लोकप्रियते मुळेच पैसा देखिल उभारला जाऊन सुखद रॉन पॉल ह्यांना उमेदवारी मिळण्याचा सुखद धक्का बसणार? ह्या दोन्हीचे सध्या कुतूहल लागले आहे.

Sunday, April 8, 2007

काही छायाचित्रे...


























































































Wednesday, April 4, 2007

किराणा भुसार अमेरिकन ष्टाईल!!

अमेरिकेत आल्यावर इथल्या सोयी सुविधा अंगवळणी पडून त्याचं अप्रूप वाटेनासं झालं की इथल्या असुविधांचा त्रास मात्र चांगलाच सुरू होतो. त्यातलाच एक छळ म्हणजे 'ग्रोसरी शॉपिंग' अर्थातच किराणा भुसार. मस्त पैकी यादी बनवावी आणि दुचाकी वरून उतरण्याचे कष्ट देखिल न घेता फक्त हॉर्न वाजवून कोपऱ्या वरच्या वाण्याकडे सुपूर्त करावी बस्स.. सगळा माल आपसूक घरी पोहोचता केला जातो. इतक्या साध्या सोप्या गोष्टींमध्ये सुद्धा किती 'सुख' आहे ह्याची जाणीव इकडं स्थिर स्थावर झाल्यावरच होते.. बरीचशी कामं स्वतःची स्वतःच करायची असल्यानं ग्रोसरि करणे वगैरे भानगडी कायमस्वरुपी लांबणीवर टाकलेल्या असतात..फ्रीज मधील फळे ज्यूस इतकंच काय भाजी पाला, देखील संपायला आला तरी ग्रोसरी हा प्रकार लांबणीवरच असतो.. 'वरण भात' नावाची सुटसुटीत सोय उपलब्ध असल्यानं त्यावर बराच काळ टिकाव धरला जातो.. शेवटी मात्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थ डाळ तांदूळ हे देखिल संपायला लागले की 'एकदा ग्रोसरी करून टाकलीच पाहिजे' असा विचार घोळू लागतो. अर्थातच त्यासाठी नुसती यादी करून इथं अजिबात भागत नाही..ती तर फक्त सुरुवात असते..एकदा का यादी केली की १०-१५ मैल गाडी हाकत जवळच्या(!) 'वॉलमार्ट' नावाच्या राक्षसी दुकानात जावे लागते. ह्या वॉलमार्टात, अंडरवेयर बनियन पासून ते वाहनाचे सुटेभाग, टायर तसंच शोभेची झाडे आणि कुंड्यांपर्यंत सगळे एकाच छताखाली मांडून ठेवलेले असते. ह्या सगळ्यामध्ये एका हातात यादी धरून दुसऱ्या हाताने ढकल गाडी ढकलत एक एक वस्तू शोधत सुटायचं.. यादीतल्या बऱ्याच वस्तूंनी (आणि यादीत नसलेल्या पण ऐनवेळी उचलाव्याश्या वाटलेल्या वस्तुंनी) गाडी भरत येईपर्यंत पायाचे चांगलेच तुकडे पडायला आलेले असतात. मग उरल्या सुरल्या वस्तूंना काट मारून, 'झालं झालं बरेचसं सामान मिळालंय. बाकीचं काय इतकं महत्त्वाचं नाही !!'अशी पायांची समजूत काढत चेक आऊट काउंटर च्या रांगेत पैसे भरायला उभं राहायचं.."अजून आपला नंबर का लागत नाही? समोरच्या जाड्यानं हे किती हे सामान घेतलं आहे? इतकी ठासून खरेदी करण्याआधी आपल्या वजनाचा तरी विचार करायचा .. ही चेकआऊट काउंटर वरची बाई किती मंद आहे...कंटाळा आला बुवा आता घरी जाऊन मस्तपैकी चहा घ्यायला पाहिजे" असे विचार मनात चाललेले असताना अचानक आठवतं, अरेच्या चहा करायला घरात दूध कुठं आहे? आणि आपल्या उरलेल्या यादीतल्या सोयोस्कररित्या विसरलेल्या वस्तूंमधील एक म्हणजे 'दूध' ह्याचा साक्षात्कार होतो.. झालं पुन्हा पळत दुधाच्या शोधात. ह्या दुधाच्या बाटल्या कोणत्याही दुकानात बरोबर विरुद्ध बाजूच्या कोपऱ्यात मागच्या भिंतीला लागून असतात.. सगळं दुकान पायाखालून घालत ह्या दुसऱ्याबाजूला पोहोचायचं.. वाटेत आजूबाजूला अजिबात बघायचं नाही.. न जाणो अजून काहीतरी आठवलं तर? शेवटी दुधाच्या विभागा पर्यंत पोहोचलं की तिथही पन्नास प्रकारची दुधं मांडून ठेवलेली असतात.. २% स्निधांश, १% स्निग्धांश, ०% स्निग्धांश असे नाना प्रकार त्यातला कुठलातरी एक उचलून पुन्हा भर भर दुसऱ्या टोकाकडे चेक आऊट करायला धावपळ..
..इतकं सगळं करून काम संपलं नाही.. वॉलमार्ट मध्ये असंख्य वस्तू मांडून ठेवलेल्या असल्या तरी, तुरीची मुगाची अश्या डाळी, गरम मसाला, पापड लोणची असे पदार्थ अर्थातच नसतात त्यासाठी पुन्हा 'इंडियन ग्रोसरी स्टोअर' नावाच्या प्रकाराकडं धाव घ्यावी लागते.. इंडियन ग्रोसरी स्टोअर ही एक वेगळीच दुनिया असते. बाकीच्या दुकानात उगीचच कृत्रिम हसून 'हाव या डुइंग? असं विचारणारे कर्मचारी इथं दिसणार नाहीत. इथं असतो तो अस्सल पुणेरी प्रकार .."ये लोणचेकी बाटली पे एक्सपायरी डेट २००४ की है"..असं त्याच्या नजरेस आणून दिल्यावर तोंडावरची माशी देखिल हालणार नाही अश्या चेहऱ्याने 'ये तो एकदम फ्रेस स्टाक है. इसके पहिले २००२ की भी बेची है.. कुछ नही होता है बिनधास्त ले जाव!' असे उत्तर. अर्थातच बाकीच्या दुकानात आपणही उगीचच हसून वगैरे बोलतो पण इथं मात्र तो ताप नाही..ह्यामध्ये हमखास गंडतो भरतातून नवीनंच आणि त्यामुळं उत्साह ओसंडून वाहणारा एखादा सॉफ्टवेअर वाला.. टी-शर्ट- हाफ चड्डी असा वेष आणि गुडघ्यापर्यंत ओढलेले मोजे बघितले की लगेच कळतं स्वारी नुकतीच मायदेशातून आलेली आहे! तो इथंही उगीचच सगळ्यांना बघून हाय हॅलो वगैरे करून हसत असतो आणि ऍक्सेंटची प्रॅक्टिस करत 'फ्रोजन चपातिज्' शोधत असतो .. असो.. तर हे इंडियन स्टोअर म्हणजे, डाळी, तांदूळ, पापड लोणची, झालंच तर फरसाण, साबुदाणा, अनेक मसाले असल्या भारतीय वस्तूंनी गच्च भरलेलं असतं इथं तुम्हाला मसाला पान, गुटखा, चारमिनार असल्या गोष्टींची सोय देखिल आढळेल.. अश्याच एका दुकानात एकदा मला 'लाइफबॉय' साबण बघून गहिवरून आलं होतं.. १०,००० हजार मैलांवरती 'लाइफबॉय' साबण मिस करणारा कोणी असामी दिसतो का? ह्याची मी बराच वेळ वाट पाहत होतो. हा माणूस हातात बादली घेऊन आणि खांद्यावर टॉवेल टाकून बाथटब मध्ये अंघोळीला जात असेल असे माझ्या मनात मी चित्रही रंगवले होते...
..इथली खरेदी झाली की ग्रोसरी हा प्रकार माझ्यासाठीतरी संपतो परंतु हे 'किराणा-पुराण' सॅम्स क्लब च्या उल्लेखा शिवाय संपू शकत नाही.सॅम्स क्लब हा वॉलमार्टचाच भाऊ असून बऱ्याचदा वॉलमार्टलाच लागूनच उभा असतो. इथं आत शिरण्यासाठी देखिल त्यांची वार्षिक वर्गणी भरून सभासद बनावं लागतं. सॅम्स क्लब म्हणजे इथला घाऊक बाजार. प्रत्येक गोष्ट घाऊक प्रमाणावर खरेदी करा आणि पैसे वाचवा हा इथला मंत्र. स्वस्त पडतात म्हणून साबणाच्या एकाच वेळीस १२ वड्या खरेदी करून नंतर वर्षभर एकच सुवास! काही महिन्यांनी तर हा वास येईनासाच होतो. इथं येण्याचा आणखी एक त्रास म्हणजे तुम्ही 'सॅम्स क्लब' ला जाणार आहात ही बातमी सगळ्यांना माहीत असते आणि त्यातूनच 'अरे सॅम्स क्लब जा रहा है क्या? मेरे लीये जरा दूध लेके आना यार' असे फोन येतात..त्यावर आपण हो म्हणून टाकताना 'जरा दूध' मध्ये सांगणाऱ्याला ७ गॅलन दूध अपेक्षीत आहे ह्याची आपल्याला सुतरामही कल्पना नसते. 'अरे इतना दूध लेके काय करेगा?' असे विचारले तर 'वहा एक गॅलन २० सेंट से सस्ता आता है' हे उत्तर निमुट ऐकावं लागतं. ह्या प्रकारामुळे 'सॅम्स क्लब' ह्या भानगडीत न पडलेलेच बरं अश्या मताचा मी बनलो आहे.
तर शेवटी अख्खा दिवस खर्च करून हुश्श करून घरी आलं की गाडीतून हा सगळा बाजार काढून घरी नेऊन फ्रीज मध्ये ठेवायला जीवावर येतं ..इतकं करूनही 'कोथिंबीर' राहूनच गेली अश्या गोष्टी मनात येत असतातच..भातात एखादा खडा लागला तरी चालेल पण सामान कोपऱ्यावच्या वाण्याकडून येण्यात काय सुख आहे हे मात्र सतत जाणवत असतं.

-वरूण

Monday, January 15, 2007

मॅट्रिक्स रसग्रहण ४

...मॅट्रिक्समध्येच असा एक जीव जन्मास येणार आहे की त्याची सुटका करण्यास माणसाला यश आले तर तो समस्त मानवजातीला यंत्रांच्या जोखडातून मुक्त करू शकणार आहे.. बस्स मॉर्फियसच्या जीवनात आता एकच ध्येय आहे..'त्या'चा शोध घेऊन त्याला मुक्त करणे.
-------------------------------------------------------------
चित्रपटाची सुरूवात होते तीच मुळी ह्या प्रसंगापासून. मॉर्फियसचा हा शोध अखेर संपला आहे. त्या एकमेवाद्वितीयाची पक्की माहिती मॉर्फियसच्या कंपूला मिळाली आहे. ट्रिनीटी, टँक, डोझर,स्विच, सायफर अशी चित्र विचित्र नावे असणारा आणि वेगवेगळ्या कौशल्यांवर प्रभुत्व असणारा मॉर्फियसचा कंपू आता 'त्या'ला मुक्त करण्याच्या मोहिमेवर लागला आहे. ह्या कंपूतले काही मॉर्फियस सारखेच मॅट्रिक्स मध्ये जन्मून नंतर मुक्त झालेले जीव आहेत तर काही झायॉन मध्येच जन्माला आलेले आणि त्यामूळेच अतिशय अभिमानाने '१००% नैसर्गिक माणूस' असा उल्लेख करणारेही आहेत... सगळ्यांना आता एकच उत्सुकता लागून राहिली आहे.. लवकरात लवकर 'त्या'ची भेट घेण्याची...
कोण आहे हा 'तो'?.... हा तो म्हणजेच चित्रपटाचा कथानायक 'निओ'. कसल्या तरी विचाराने सतत झपाटलेला.. तास न तास संगणकावर बसून राहणारा.. झोपेचे कसलेही वेळापत्रक नसणारा.. प्रसंगी जागे आहोत की स्वप्न रंजन करत आहोत ह्याचे भानही नसणारा.. आणि कधी ना कधी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ह्या आशेवर असणारा निओ...
इकडे यंत्र जगतालाही माणसांच्या ह्या करामतींचा सुगावा लागलेला आहे. मॅट्रिक्स मध्ये होणाऱ्या हॅकिंगवर उपाय म्हणून काही खास आज्ञावल्या लिहिल्या जात आहेत. सामान्य लोकांच्या नजरेत एखाद्या 'गुप्तचर संघटनेचे अधिकारी' म्हणून वावरणाऱ्या व्यक्ती ह्या प्रत्यक्षात एखाद्या 'अँटी-व्ह्यायरस' प्रणाली प्रमाणे मॅट्रिक्स सतत पिंजून काढणाऱ्या आज्ञावल्या आहेत.. मॉर्फियसच्या कंपूला मॅट्रिक्स मध्ये घुसण्यापूर्वी आता ह्या अधिकाऱ्यांना चकवण्याचीही तयारी करावी लागत आहे.
जरी ह्या गुप्तचर अधिकाऱ्यांना मॉर्फियसच्या कंपूतील एकालाही पकडण्यात यश आले नसले, तरी मॉर्फियसचे पुढचे लक्ष्य 'निओची सुटका' आहे हे लक्षात आले आहे. एका बाजूला मॉर्फियस आणि त्याचा कंपू तर दुसऱ्या बाजूला हे गुप्तचर अधिकारी दोघेही निओचा शोध घेण्यासाठी मॅट्रिक्स पिंजून काढत आहेत तर स्वतः निओ मात्र ह्या सगळ्यापासून पूर्णं अनभिज्ञ आहे... अखेर मॉर्फियसने निओशी संपर्क साधतो पण त्याच वेळेस अधिकाऱ्यांनाही निओचा सुगावा लागल्याने, तेही निओच्या कार्यालयावर धाड घालून त्याच्या शरीरात एक उपकरण सोडून त्याचा माग ठेवायची सोय करतात.
मॉर्फियसचा कंपू विरुद्ध ह्या अधिकाऱ्यांची ताकद अश्या मुकाबल्या मध्ये अखेर मॅट्रिक्सला गुंगारा देऊन निओला काबीज करण्यात मॉर्फियसला यश मिळते... निओला मानवी शेतातून पळवून आणले जाते.... हे नक्की काय घडत आहे? आपल्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार? हे प्रश्न मात्र निओसाठी अजूनही अनुत्तरितच आहेत.. त्याच्या कानात फक्त मॉर्फियसचा खर्जातला आवाज साठून राहिला आहे..
"शांत राहा सर्व उत्तरे एक एक करून येता आहेत! "

मॅट्रिक्स रसग्रहण ३

'मॅट्रिक्स' हा असाच एक व्हर्च्युअल रिऍलीटी प्रोग्रॅम आहे. जो प्रत्येकाच्या मेंदूने स्वीकारला आहे. प्रत्येक जण आपापल्या दुनियेत मग्न असला तरी नियंत्रण हे शेवटी त्याच्या निर्मात्याकडे आहे.
-----------------------------------------------------------------
इतकी क्लिष्ट प्रणाली बनवणे यंत्रांना सहज शक्य झाले का?.. बिलकूल नाही! ही प्रणाली बनवण्यासाठी यंत्रांना खूप मेहनत घ्यावी लागली.. मॅट्रिक्सची सुरुवातीच्या आवृत्त्या माणसांच्या मेंदूंकडून नाकारल्या जायच्या... आणि त्यांना गाढ झोपेत ठेवणे अशक्य व्हायचे... सुरुवातीच्या आवृत्त्यांमध्ये मॅट्रिक्सच्या रचनाकारांनी एक अतिशय आदर्श जग बनवले... सगळेच अतिशय आनंदी राहतील आणि त्यामुळे त्यांची मने ह्याचा सहजगत्या स्वीकार करतील असा सोपा युक्तिवाद त्यामागे होता. पण प्रत्यक्षात मात्र हे आदर्श जग सपशेल अपयशी ठरले. ह्याचे कारण शोधण्यासाठी यंत्रांना, अतिशय जटिल अश्या मानवी मानसशास्त्राचा त्यांना अभ्यास करावा लागला. नक्की कशा प्रकारचे हे मायावी जग बनवले म्हणजे लोक त्याचा लगेच स्वीकार करतील? ह्यावर रचनाकारांनी बरेच संशोधन केले, आणि त्यातूनच निर्मिती सुरू झाली मॅट्रिक्सच्या सध्याच्या आवृत्तीची.
मॅट्रिक्सच्या रचनाकारांच्या लक्षात आले की कितीही आदर्श आणि सुंदर जग बनवले तरी दुःख,दैन्य दारिद्र्य, पीडा ह्यांचा समावेश केल्याखेरीज मानवी जीवन अपूर्ण आहे,आणि त्यातूनच अवतरली मॅट्रिक्सची सध्याची आवृत्ती. साधारण सन २००० च्या सुमारास जग जसे होते तसे हुबेहूब जग बनवण्यात आले...तंत्रज्ञान,प्रगती, वैभव ह्यांच्या सोबत दैन्य दारिद्र्य ह्यांचाही समावेश करण्यात आला. हजारो आज्ञावल्या नव्या लिहिल्या गेल्या .. अनेक बदलण्यात आल्या...आणि शेवटी सध्याची आवृत्ती प्रकाशीत करण्यात आली... आणि काय आश्चर्य.. माणसांच्या मेंदूंनी ह्या नव्या प्रणालीचा अगदी अलगद स्वीकार केला. लाखो जीव गाढ झोपेत ठेवण्यास यात्रांना अखेरीस यश मिळाले.. यंत्रांना भेडसावणारा ऊर्जेचा प्रश्न एकदाचा सुटला.
यंत्र आणि माणूस ह्यांच्यामध्ये झालेल्या भीषण युद्धामध्ये जी काही माणसे जगली वाचली होती त्यांनी एकत्र येऊन पळ काढला आणि सरळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्खनन करून खोल पाताळात एक नवे शहर वसवले आणि तिथे ते दडून राहिले. ह्या शहराला नाव दिले गेले 'झायॉन' - मानवी अस्तित्वाचे शेवटचे शहर. इथे खोल पाताळात दडून माणसाला यंत्रांची कामगिरी पाहत राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. यंत्राशी आमने सामने मुकाबला करणे अशक्याच्याही पलीकडे होते... एकमेव आशेचा अंधुक किरण होता जो म्हणजे 'गनिमी कावा'.. यंत्रांनी बनवलेल्या मॅट्रिक्स मध्ये हॅकींग करून घुसणे आणि झोपलेल्या जिवांना उठवून त्यांना हे 'स्वप्न' आहे ह्याची जाणीव करून देणे. अशी जाणीव झालेले जीव, मानवी शेतांमध्ये चोरून घुसून झायॉनमध्ये आणायला सुरुवात झाली. मॅट्रिक्सच्या मधल्या विशिष्ट लोकांची निवड करून त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणे सुरू झाले. असाच एक सुटका झालेला माणूस म्हणजे 'मॉर्फियस'. मॅट्रिक्स मध्ये असताना हॅकर म्हणून जगणारा मॉर्फियस आता मुक्त होऊन त्याच कौशल्याचा वापर करत आहे मॅट्रिक्स मध्ये हॅकिंग करण्यासाठी.
मॉर्फियस झपाटला आहे एकाच ध्येयाने. ..'ऑरकल' नावाच्या एका विदुषीच्या भविष्यवाणीवर त्याचा गाढ विश्वास आहे.. ऑरकलच्या भविष्यावाणी नुसार मॅट्रिक्समध्येच असा एक जीव जन्मास येणार आहे की त्याची सुटका करण्यास माणसाला यश आले तर तो समस्त मानवजातीला यंत्रांच्या जोखडातून मुक्त करू शकणार आहे.. बस्स मॉर्फियच्या जीवनात आता एकच ध्येय आहे..'त्या'चा शोध घेऊन त्याला मुक्त करणे.

मॅट्रिक्स रसग्रहण २

बऱ्याचशा विज्ञान कथांमध्ये दिसणारे हे कथानक पूर्णं वळण घेते ते ह्या टप्प्यावर..‌ सर्व उपाय कुचकामी ठरल्यावर ऊर्जेची गरज भागवण्यासाठी यंत्रांनी काढलेली टूम म्हणजे ह्या चित्रपटाचा गाभा....
अस काय बरं केलं यंत्रांनी?.....

-----------------------------------------------------------------
ऊर्जेचा स्रोत अखंड राहण्यासाठी यंत्रांनी चक्क सुरू केली, पूर्ण पाडाव झालेल्या माणूस नावाच्या प्राण्याची शेती!!.. प्रत्येक मानवी शरीरांचा वापर ऊर्जानिर्मितीची यंत्रे म्हणून यंत्रांनीच करायला सुरुवात केली. कृत्रिमरीत्या मानवी जीवांची पैदास करून त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर यंत्रांचा कारभार चालू लागला. पृथ्वीच्या पाठीवर ही अशी अगणित शेते उभी राहिली... माणसाला जन्म देणे बंद झाले राहिली ती फक्त पैदास!...ह्या सर्व शेतांमध्ये असंख्या मानवी जीव झोपेत ठेवून त्यांची ऊर्जा शोषून घेण्याची यंत्रणा उभी राहिली. ह्या सगळ्या यंत्रणे मध्ये एक त्रुटी होती.. ती म्हणजे इतक्या साऱ्या जीवांना कायम झोपेत ठेवणे...
..त्यावर उपाय म्हणून निर्मिती झाली मॅट्रिक्स नावाच्या अद्भुत प्रणालीची. कल्पना करा की आपल्याला एक स्वप्न पडले आहे.. ते इतके खरे आहे की आपण स्वप्न आणि वास्तव ह्यातले भानच विसरून गेलोय.. साहजिकच त्या स्वप्नातून बाहेर आल्यावर आपली मनस्थिती , 'अरेच्या! आता जे अनुभवले ते स्वप्न होते होय?' अशी होते... मॅट्रिक्स हे असेच समस्त मानवजातीला 'पाडले'ले एक स्वप्न आहे... सत्य स्थितीपासून डोळ्यावर झापडे ओढून कायमचे गाढ झोपी ठेवण्यास कारणीभूत ठरणारे स्वप्न म्हणजेच मॅट्रिक्स... ह्या स्वप्नात एक हुबेहूब जग तयार केले आहे...ज्यामध्ये सगळे आपापले जीवन जगतात, कामे करतात आयुष्यात पुढे जातात पण सत्यात मात्र प्रत्येक जण खितपत पडला आहे ह्या शेतांमध्ये. लोकांच्या मनांनी हे स्वप्न इतके खोलवर स्वीकारले आहे की त्यांना ह्या झोपेतून जाग येणे शक्य नाही. थोडक्यात मॅट्रिक्स ही एक अशी आज्ञावली आहे की ज्यातून लोकांना सत्याचा भास इतका बेमालूमपणे केला आहे की आभास आणि वास्तव ह्यातला फरक मानवी इंद्रियांच्या पलीकडे आहे.
सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे.. तुम्हाला आवडलेला एखादा भावुक चित्रपट आठवा.. चित्रपटातील सर्व प्रसंग हे कृत्रिम/खोटे/काल्पनिक आहे हे माहीत असून देखिल काही वेळेला आपल्याला हुंदका अनावर होतो, कारण आपण त्या चित्रपटात इतके समरस झालो असतो की आपल्या सब-कॉन्शस लेव्हल वरती मनाने हे सत्य म्हणून स्वीकारलेले असते. आता हा झाला साध्या एका चित्रपटाचा परिणाम...एका द्विमितीय माध्यमातून! समजा ह्याच्या पुढे एक पायरी जाऊन तुम्हाला एका संगणक निर्मित त्रिमितीय जगात नेले ज्याला 'व्हर्च्युअल रिऍलीटी' असे संबोधले जाते..तर तुमच्यावर होणारा परिणाम कितीतरी अधिक असेल... थोडक्यात वास्तव म्हणजे जर निव्वळ तुमच्या मेंदूने ग्रहण केलेल्या काही विद्युत लहरी असतील.. तर अशा कृत्रिम लहरी मेंदूला पाठवून वास्तवाचा बेमालूम आभास करणे शक्य आहे.
'मॅट्रिक्स' हा असाच एक व्हर्च्युअल रिऍलीटी प्रोग्रॅम आहे. जो प्रत्येकाच्या मेंदूने स्वीकारला आहे. प्रत्येक जण आपापल्या दुनियेत मग्न असला तरी नियंत्रण हे शेवटी त्याच्या निर्मात्याकडे आहे.

मॅट्रिक्स- रसग्रहण १

पांढरी शुभ्र पार्श्वभूमी. एक सोफा एक जुना टी.व्ही आणि दोन व्यक्ती बस्स!
गूढ निरव शांतता..
लॉरेन्स फिशबर्न चा धीर गंभीर आवाज...
"वास्तव म्हणजे नक्की काय?" ..आपल्या मनात विचार येतो-हा कसला प्रश्न?.... ह्यावर तोच उत्तर देऊ लागतो "जे तुम्ही पाहू शकता? स्पर्शू शकता ऐकू शकता चाखू शकता ते म्हणजे वास्तव का?"...
" तसे असेल तर वास्तव म्हणजे निव्वळ तुमच्या मेंदूने ग्रहण केलेल्या काही विद्युत लहरी"
सुरुवातीला अतिशय गुंतागुंतीचे, क्लिष्ट, प्रसंगी अगम्य आणि असंबद्ध वाटणारे कथानक अचानक ह्या प्रसंगापासून उलगडायला चालू होते.
काय आहे ही 'मॅट्रिक्स' भानगड? ह्या प्रश्नाने आपल्याला कथा नायका सारखेच झपाटून सोडलेले असते.. आणि एकदाचा मॉर्फियस आपल्याला ह्या पांढऱ्या पार्श्वभूमीवर घेऊन जातो. खरंच वास्तवाची व्याख्या नक्की काय? चला तर मग थोडे सुरुवातीपासून काय घडले ह्याची उजळणी करूया, म्हणजे बरेच संदर्भ लागतील... ह्या चित्रपटाचा कथानायक - 'थॉमस अँडरसन'.. संगणक कंपनीमध्ये काम करणारा एक तसा सामान्यच आज्ञावली लेखक... कामावर उशीरा येणे महत्त्वाच्या कामामध्ये दिरंगाई करणे अश्या कारणांमुळे बॉसची बोलणी खाणारा..पोटार्थी कर्मचारी.. परंतु खासगी आयुष्यात मात्र एक वेगळेच जीवन जगणारा. हे जग म्हणजे संगणक आणि महाजालाचे विश्व..इथं त्याची पूर्ण वेगळी ओळख आहे. इथं तो ओळखला जातो ते 'निओ' ह्या टोपण नावाने वावरणारा एक कुशल हॅकर म्हणून....निओ सारखेच अनेक लोक इथं वेगवेगळ्या टोपण नावांनी वावरतात.. एकमेकाला जवळून ओळखणारे पण प्रत्यक्षात पुरुष आहेत की स्त्री ह्याची सुद्धा माहिती नसणारे हे लोक आणि त्यांची ही टोपण नावांची दुनिया... 'मॉर्फियस' 'ट्रिनिटी' हि काही गाजलेली टोपण नावे...त्यांना कधीतरी प्रत्यक्षात भेटायला मिळावे ही निओची इच्छा..इथल्या बऱ्याचशा चावड्यांवर सध्या एकच विषय घोळतोय, 'मॅट्रिक्स' ही काय भानगड आहे?' बऱ्याच जणांना ह्याचे कुतूहल लागून राहिले आहे. अशातच निओशी मॉर्फियस कडून संपर्क साधला जातो आणि त्यांची एकदाची भेट घडते..
"मॅट्रिक्सची एका शब्दात व्याख्या म्हणजे - 'नियंत्रण' कुणीही कधीही कल्पना सुधा केली नसेल असे एक अद्भुत नियंत्रण" मॉर्फियस समजावू लागतो. पूर्वी कधीतरी माणसाने यंत्र निर्मितीमध्ये इतकी प्रगती केली यंत्रांना कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशीयल इंटिलीजन्स) देण्यात आली. कृत्रिम आणी नैसर्गिक ह्यातल्या सीमा रेषा कधी पुसट होत गेल्या कळलेच नाही आणि ह्या यंत्रांना स्वतःची असे व्यक्तिमत्त्व येऊ लागले. तेव्हा माणसाच्या लक्षात ही चूक आली आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून यंत्राचा संहार सुरू केला.. परंतु तो पर्यंत प्रचंड बुद्धिमत्ता प्राप्त झालेल्या ह्या शक्तिशाली यंत्रांनीही त्याचा प्रतिकार सुरू केला ज्याची परिणिती एका अकल्पनिय अश्या युद्धामध्ये झाली... अर्थातच माणसाला यंत्रापेक्षा जास्त मर्यादा असल्याने त्याची हार होते आहे असे दिसू लागल्यावर शेवटचा उपाय म्हणून माणसाने यंत्रांचा ऊर्जेचा एकमेव स्रोत 'सूर्य' एक कृत्रिम ढग निर्माण करून बंद केला.
बऱ्याचशा विज्ञान कथांमध्ये दिसणारे हे कथानक पूर्णं वळण घेते ते ह्या टप्प्यावर..‌ सर्व उपाय कुचकामी ठरल्यावर ऊर्जेची गरज भागवण्यासाठी यंत्रांनी काढलेली टूम म्हणजे ह्या चित्रपटाचा गाभा....
अस काय बरं केलं यंत्रांनी?.....

Friday, January 12, 2007

दैव

मूळ कथा कोणाची आहे हे माहीत नाही. पौराणिक वाटते!

यमराज आपल्या रेड्यावर बसून वनातून चलले होते. अचानक एक झाडापाशी थांबले आणि त्यावर बसलेल्या एका पोपटा कडे पाहून 'हे अशक्य आहे! हे अशक्य आहे!!' असे अचानक ओरडू लागले.
साक्षात यमराज समोर बघून आणि त्यांचा चढलेला आवाज ऐकून बिचाऱ्या पोपटाचा एवढासा जीव कावरा बावरा झाला. ह्या प्रकाराने घाबरून त्याने आकाशात उंच झेप घेतली. एवढी उंच की पोपट, चिमणी अश्या छोट्या पक्ष्यांची पातळी सोडून घार गरूड अश्या मोठ्या पक्ष्यांच्या पातळीत कधी प्रवेश केला हे त्यालाच समजले नाही.
जवळूनच उडत चाललेल्या एका गरूडाची नजर ह्या पोपटावर गेली आणि त्याने विचारले, 'काय रे पोपटा इतक्या वर कुठे आलास आज?' ह्यावर पोपट म्हणाला,'अहो गरूड राव काय सांगू, साक्षात यमराज खाली बघितले आणि त्यांचा तो अक्राळ विक्राळ आवाज ऐकून मला तर वाटले मी मेलो आता.'
ह्या उत्तराने काहीश्या आश्चर्यचकित झालेल्या त्या गरूडाला पोपटाची दया आली. त्याने ठरवले ह्या पोपटाला काही करून यमाच्या तावडीतून सोडवायचे. त्याने पोपटाला आपल्या पाठीवर बसवले आणि दूर हिमालयात,उंच ठीकाणी एका छोट्याश्या गुहेत लपवून ठेवले आणी स्वतः यमाला भेटण्यासाठी वनात आला.
यमराज तिथेच होते. गरूडाने विचारले,'काय रे यमा, आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून त्या बिचाऱ्या पोपटाला का त्रास देत होतास?' ह्यावर यम उत्तरला,'मी कुठे त्रास देत होत होतो? मी फक्त हे अशक्य आहे असे स्वतःशीच म्हणत होतो. कारण तूच बघ ना हा पोपट केवढासा त्याचा जीव तो काय आणि तरीही माझ्या कडच्या यादीत नोंद आहे की त्याचा मृत्यू अवघ्या काही तासात दूर हिमालयात उंच बर्फात होणार आहे..आता तूच सांग हे शक्य आहे का?'

Sunday, January 7, 2007

एक अनामिक कथा

मूळ इंग्रजी कथा कामाच्या ठिकाणी 'फ्रीज'वर कोणीतरी लावली होती. वाचताक्षणीच खूप आवडली त्याचा हा जमेल तसा स्वैर अनुवाद केला आहे
___________________________________________________________
ख्रिसमस तोंडावर आला होता. सर्व लोक आपापल्या मित्र मैत्रिणींना, आप्तेष्टांना भेटवस्तू पाठवण्यात गर्क होते. टपाल खात्यातील लोकांना तर श्वास घ्यायला वेळ नव्हता. अशातच एका टपाल कर्मचाऱ्याच्या नजरेला एक पत्र आले. पत्रांची पत्तेवार विभागणी करण्यासाठी त्याने पत्ता बघितलं तर तो, 'टु गॉड हेवन' असा होता. प्रेषक म्हणून कोणा महिलेचे नाव होते. ह्या कर्मचाऱ्याची उत्सुकता ताणली गेली आणी त्याने ते पत्र फोडून वाचले. त्यातला मजकूर कोण्याएका वृद्ध स्त्री ने लिहिला आहे असे त्याच्या लक्षात आले. मजकूर असा होता,

हे परमेश्वरा,
ऐन नाताळ तोंडावर आला असताना एका भामट्याने काल बाजारात माझी पिशवी लांबवली. त्यांमध्ये माझे पाकीटही होते आणी त्यात माझी वर्ष भराची बचत होती. आता ह्या सणासुदीच्या दिवसात मला म्हातारीला थंडीमध्ये कुडकुडतं उपाशी बसावे लागणार. आता तूच काहीतरी कर रे. आपल्या ह्या भक्ताच्या हाकेला धावून ये.
काहीतरी करून मला निदान शंभर डॉलर जरी पाठवलेस तरी ह्या वर्षीचा नाताळ मी साजरा करू शकेन.
हा मजकूर वाचून त्या कर्मचाऱ्याला चांगलेच हसू फुटले पण त्या अडाणी म्हातारीची कीवही आली. अचानक त्याला ह्या म्हातारीला मदत करण्याची एक कल्पना सुचली. त्याने ते पत्र आपल्या सगळ्या सहकार्यांना दाखवले आणी म्हातारीला मदत करण्याचे आवाहन केले.
बाकीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दया येउन कुणी दोन डॉलर कुणी पाच डॉलर अशी वर्गणी जमा केली. सगळे जमलेले पैसे मोजले तर ते ऐशी डॉलर निघाले.
झाले ह्या कर्मचाऱ्याने एक लिफ़ाफ़ा घेतला त्यावर लिहिले प्रेषक -ग़ॉड आणी म्हातारीच नाव पत्त्यासहित ते पैहे पाठवून दिले. आणी सगळे जण झाली घटना विसरून गेले.
आठ एक दिवसांनी ह्याच कर्मचाऱ्याच्या नजरेला अजून एक पत्र आले. टु गॉड आणी प्रेषक तिच म्हातारी. ह्या कर्मचाऱ्याला काही राहवले गेले नाही आणी त्याने क्षणाचाही विलंब न लावता ते पत्र उघडले.
त्यातला मजकूर असा होता,

प्रिय परमेश्वरा,
तुझी लीला अगाध आहे. माझा तुझ्यावरचा विश्वास अजूनच दृढ झाला आहे. परंतू आजकालच्या जगाचे मात्र काही खरे राहिले नाही आहे. मला खात्री आहे माझ्या हाकेल प्रतिसाद देऊन तू मला शंभर डॉलरच पाठवले असणार, पण त्या टाळू वरच लोणी खाणाऱ्या भ्रष्ट टपाल कर्मचाऱ्यांनी त्यातले सुधा वीस डॉलर मारून मला ऐशि डॉलरच पाठवले रे.

टपाल कर्मचाऱ्याचा चेहरा तोंडात मारल्यासारखा झाला!

मैत्री

मूळ इंग्रजी कथा कुठे वाचली होती ते स्मरत नाही. मनाला वाचताक्षणी भिडली. मूळ कथा माझ्याजवळ नसल्याने जमेल तसा आठवून स्वैर अनुवाद केला आहे.
________________________________________________________________

ही कथा आहे दोन मित्रांच्या मैत्रीची. कथेखातर त्यांना नावे देऊ,अमित आणि अरविंद.
बालपणा पासुनचे जीवश्च कंठ्श्च मित्र. शालेय शिक्षण जसे एकत्र एकाच बाकावर बसून तसेच पुढे महाविद्यालयीन शिक्षणही एकत्र. कोणाचीही दृष्ट लागावी अशी अतूट निरपेक्ष मैत्री. दोघांचीही शिक्षण संपल्यावर देशसेवेसाठी लष्करात भरती होण्याची महत्त्वाकांक्षा. बुद्धिमत्ता आणी शरीरयष्टीच्या बळावर दोघेही लष्करात भरती होतात.
योगायोगाने लष्कराच्या एकाच तुकडी मध्ये दोघानंही प्रवेश मिळतो. दिवसागणीक मैत्री अधिक दृढ होत चाललेली असते. अशापरिस्थित देशावर अरिष्ट येऊन युद्धाचे ढग जमा होऊ लागतात आणी कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण होते.
दोन्हिदेशामधे चाललेल्या वाटाघाटी फ़िसकटत जाऊन अखेर शेजारी राष्ट्राशी घमासान युद्ध सुरू होते. अमित आणि अरविंद एकाच तुकडीमध्ये असल्याने युध्धभुमिवरही एकाच आघाडीवर नियुक्ति होते. दोन्हिबाजुने रोजची तुफान धुमश्चक्रि चालू असते. अश्यांतच तो दिवस उजाडतो...
अमित अरविंद ची तुकडी शत्रूने काबीज केलेला एक एक प्रांत प्रसंगी रक्ताचे पाट वाहवून आपल्या मातृभूमीकडे सुपूर्त करत जिगरबाजणे पुढे निघालेली असते. अचानक एकाठिकाणी शत्रूचा अंदाज काढणे कठिण होऊन बसते. दोन्हीकडून गोळीबार चालू असतो. शत्रूचा अचूक ठावठिकाणा काढणे अवघड होऊन बसते. कोणीतरी धाडसाने पुढे घुसणे हाच पर्याय उरतो. अमित क्षणाचाही विलंब न करत एकटे पुढे घुसण्याची वरिष्ठ अधिकाऱ्यास विनंती करतो. धोका जीव गमावण्याचा असल्याने वरिष्ठ आधीकारी परवानगी देण्यास साशंक असतात. अखेर अमितच्या जिद्दी स्वभावापुढे माघार घेऊन त्याला परवानगी देतात.
पूर्णं तुकडी अमितकडे श्वास रोखून पाहतं असते. अमित एक एक पाऊल सावधपणे उचलून शत्रूच्या दिशेने कुच करू लागतो. जेम तेम दहा वीस फूट अंतर चालून जातो आणी कुठुनशि एक बंदुकीची गोळी सुं...करत अचानक येते आणी अमितच्या मस्तकाचा अचूक वेध घेते. त्याच्या वाटचालीवर लक्ष ठेवून असणारी त्याची तुकडी क्षणभर स्तब्ध होऊन जाते. अरविंदच्या तर काळजाचा ठोका चुकतो. आपला जीवाभावाचा मित्र आपल्या समोर कोसळलेला पाहून त्याचा धीर खचू लागतो.
अमित जमीनीवर कोसळून, क्षिण आवाजात त्याला हाक मारत असतो. आतामात्र त्याला राहवत नाही धावत जाऊन अमितला भेटण्यासाठी अरविंदचे मन आतुर होते. तो त्याच्याकडे धाव घेणार इतक्यात वरिष्ठ त्याला अडवतात. "गोळी मस्तकात लागली आहे, जीव वाचण्याची तीळमात्र शक्यता नाही.मी आत्ताच एक आधीकारी गमावला आहे मला अजून एका अधिकाऱ्याचा जीव पणास लावायचा नाही आहे!" वरिष्ठांचे तर्कास पटणारे परंतु मनास न पटणारे उत्तर.
अरविंदची प्रचंड द्विधा मनस्थिती. एकीकडे वरिष्ठांचा ठाम नकार, तर दुसरीकडे मित्राची क्षिण होत चाललेली हाक. मन सून्न होऊन जाते, मेंदू बधिर होऊन जातो आणी अचानक निर्णय घेतो, बस्स!! मला त्याच्या हाकेला प्रतिसाद दिलाच पाहिजे. प्राणाची आणी वरिष्ठांची पर्वा न करता तो अमितच्या दिशेने झेपावतो. अमितजणु त्याची वाटच पाहतं असल्याप्रमाणे त्यांला भेटताच दोन शब्द बोलून जगाचा निरोप घेतो. अरविंद विमनस्कपणे माघारी फिरतो.
वरिष्ठ त्याच्या ह्या कृतीचा जाब विचारतात, "मी आधीच कल्पना दिली होती, तो वाचणे अशक्य होते. विनाकारण तु तूझा जीव का धोक्यात घातलास?"
"त्याचे शेवटचे शब्द माझी भेट सार्थक ठरवून गेले." अरविंद
"असे काय म्हणाला तो?" वरिष्ठ
तो फक्त एवढेच म्हणाला,

"अरविंद, मला खात्री होती तू येणार!!"
जी.ए. कुलकर्णी यांच्या 'स्वामी' कथेतील माझा आवडीचा हा काव्यमय उतारा. ज्येष्ठ अभिनेते 'मधुकर तोरडमल' ह्यांनी आपल्या 'तिसरी घंटा' ह्या आत्मचरित्राचा शेवटही ह्याच ओळी लिहून केला आहे.
__________________________________________________________________

तू असाच वर जा.अंधाऱ्या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणाऱ्या ईर्षेने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सूर्यप्रकाशाला भेटू दे.तुला जर फुले येतील -आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फुले यावीत व त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत.तुला जर फुले येतील, तर अश्या सहस्र फुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे.तुला जर फळे येतील- आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फळ यावे व ते इतके रसरशीत असावे की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सूर्यप्रकाशाचा एक एक कण सतत सुखाने नांदत राहावा.तुला जर फळे येतील, तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पाहा. कारण तू अश्या अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस.मग तुझ्या बीजांची फळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. जर कणाएवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर.त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक एक कण प्रकाशीत केला आहे.आभाळात एखादे लहान पाखरू उडताना दिसले तर तू त्याला आतिथ्य दाखव. कारण दोन कोवळ्या पंखाच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटतं आहे. जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून पुन्हा ते आडवे उघडले व पानाचा आरसा केला; किंवा कधी तुझे पिवळे फूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखून घेतली; अगर तुझे एक लाल फळ खुडून ते दोन बोटात चेंगरत रसाचा लाल धागा काढला, तर त्याच्यावर कृद्ध होऊ नकोस.कारण, कुणास ठाऊक, अब्जामध्ये एक आढळणारे असे ते मूल असून ते देखील भोवतालच्या अजस्र भिंती फोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल.आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे.म्हणून तू त्याच्यावर कृद्ध होऊ नकोस.एक पान गेल्याने तुला दारिद्र्य येणार नाही,एक फूल गेल्याने तुझे सौंदर्य उणे भासणार नाही.एक फळ नाहीसे झाल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही.इतके वैभव तुला आहे. इतके वैभव तुला मिळो!या साऱ्यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एक पान म्हणजे माझा एक एक श्वास आहे. म्हणून तू म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर केवळ बदललो आहे. तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे.मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या करंज्यांप्रमाणे वर आलो आहे, हे देखील इतरांना कळू दे.म्हणून तू असाच वर जा.

-जी.ए. कुलकर्णी
कथा - स्वामी
कथासंग्रह - पिंगळावेळ