
पुण्यामध्ये लोकांना कांदा पोह्यांवर सांबार घालून खाताना पाहिले आहे. होय होय..ज्यात इडली नामक पदार्थ बुडवुन खातात तेच सांबार! इडली सारख्या सौम्य मृदु स्वतःची अशी फारशी चव नसणार्या (म्हणजे बेचव नव्हे हा!) इडलीवर ते वाफाळणारे चचमीत सांबार घालून खायला छानच लागते. पांढरी शुभ्र हलकी फुलकी इडली आणि त्याच्या बाजुला एका वाटीत, (इडलीवरच बचकन ओतलेले नव्हे) लालसर सांबार ही जोडी म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटतो. पण ह्याच दक्षीणेच्या सांबाराचे लगीन मराठमोळ्या कांदा पोह्यांशी का लावले जाते हे म्या पामराला तरी अगम्य वाटते. कांदा पोह्यांचा एकमेव जोडीदार म्हणजे गरमा गरम वेलदोडा युक्त अमृततुल्य चहा. (आणि तो देखिल बाजुला एका कपात बरका! पोह्यांवर घालुन नाही :)) इडली सोबत सांबार फुकट (पाहिजे तेवढे)मिळते म्हणून पोह्यांचा भाव कमी झाल्याने पोह्यांवर देखिल सांबार ओतुन खायची प्रथा पुण्यात पडली असावी. पण उद्या सांबारा सारखे चहा देखिल काँप्लिमेंटरी द्यायला लागले तर इडली चहात बुडवुन खाणार का असा प्रश्न मला पडतो.
असो ह्या सगळ्याची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे ह्या आठवड्यात अमेरिकेत सुरु होणारा डे लाइट सेव्हींग प्रकाराची सांगता (की सुरुवात नक्की माहित नाही :")) आत तुम्ही म्हणाल डॅ लाइट सेव्हिंग आणि पोह्यात सांबर घालुन खाण्याचा काय संबध? सांगतो.. जगात लोक बर्याचदा काही गोष्टी का करतात? असा प्रश्न जेव्ह जेव्हा मला पडतो तेव्ह तेव्हा ह्या सांबार पोह्यांची आठवण होते. पोह्यांवर सांबार घालुन का खाल्ले जाते हे जितके अगम्य आहे तितकेच हे डे लाईट सेव्हिंग प्रकरण (माझ्यासाठी) अगम्य आहे. अचानक एका दिवशी सगळ्यांनी आपापल्या घडाळ्यातील काटे उलटे फिरवायचे, आठ वाजले असताना नऊ वाजले म्हणायचे ह्यातुन नक्की काय साध्य होतं ते मला अजुनही उलगडलेलं नाही. आपल्याला सकाळी आवरायला एक तास जास्तिचा मिळाला म्हणून आनंदीत व्हायचे तर १ तास कामावरुन उशीरा सुद्धा निघावे लागते.हे म्हणजे बुधवारला उगीचच रविवार म्हणण्याची टूम काढल्यासारखे झाले. रविवार म्हणालो तरी आहे तो बुधवारच ना आणि काम तितकेच करायला लागणारना मग हा मुर्खपणा कशासाठी? आणि त्यातही गोंधळात भर म्हणजे अमेरिकेतील २-३ (अतीशहाण्या) राज्यांना 'डे लाईट सेव्हिंग' नामंजूर असते. म्हणजे आधीच एका देशात ४ वेगळ्या वेळा आहेत त्यात ह्या दोघांची भर म्हणजे एकाच देशात तुम्ही कुठल्या राज्यात आहात ह्यावर तुमच्या ६ वेगवेगळ्या वेळा ठरतात. ह्यात मला सगळ्यात आश्चर्य वाटते ते विमान कंपन्यांचे. आपल्या कडच्या एष्टी स्टँडासारखी भराभर वेगवेगळ्या गावाला विमाने सोडताना कुठल्या गावात कुठली वेळ आहे त्याप्रमाणे नियोजन करताना त्यांच्या नाकी नऊ येत असतील.
सगळ्यात पहिल्या वर्षी इकडे आल्यावर ह्या डेलाईट सेव्हिंगची अंमळ गंमत वाटली होती. एक असाइनमेंट पूर्ण करुन ४.०० वाजता द्यायची होती. चिक्कार गडबड करुनही ४.००च्या आत काही ती पूर्ण झाली नाही तेव्हा आता काय असा प्रश्न पडला असताना अचानक मित्राने सांगीतले अरे हे काही ४.०० नाही वाजलेलेत ३.००च वाजलेत! पण ती गंमत तेवढीच नंतर नंतर मात्र जेव्हा ३.०० वाजताच बाहेर अंधार पडायला लागला ते बघून ह्या मूर्खपणाविषयी विचार करायचे सोडून दिले.
1 comments:
मला हा प्रकार पहिल्यांदा माहिती नव्हता. ऑफिसात नेहमीप्रमाणे 'वेळेवर' आलो आणि मीटिंगसाठी गेलो तोपर्यंत पोपट झाला आहे हे कळले नाही.
Post a Comment