Wednesday, December 3, 2008

"अ-हिंसा"

महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसावाद ह्या विषयी भारतातल्या प्रत्येकाला काही ना काही मत असतेच. बहुतांश वेळेला ही मते आंधळ्या गांधी भक्तीने वा आंधळ्या गांधी द्वेषाने पूर्वग्रह दुषित असतात. ह्या पार्श्वभूमीवर डॉ.धनंजय वैद्य ह्यांचे अभ्यासू लेखन मला वेगळे आणि विचार करण्याजोगे वाटले. डॉ.धनंजय वैद्य ह्यांचे विचार त्या निमित्ताने इथे(त्यांच्या परवानगीने)प्रकाशित करत आहे.

----------------------------------------------------------------

"अ-हिंसा" हा शब्द (=नॉन-व्हायोलेन्स) हा भारतातला खास आहे. बाकी देशांत पीस/पाक्स/सलाम/शालोम वगैरे कल्पना साधारण हिंसेपासून मुक्त स्थिती दर्शवतात. पण त्यामध्ये काही सूक्ष्म धोरणात्मक फरक असतो.

अहिंसेचे तत्त्व अनेक संस्कृतींमध्ये सैद्धांतिक पातळीवर लोकांना आवडते. (दुसरा गाल पुढे करणे, हे येशूचे बोल, भारतीय नव्हेत.) अशा प्रकारचे (सैद्धांतिक) धोरण अत्यंत मर्यादित स्वरूपात रानटी टोळ्यांतही आढळते. सर्वात मर्यादित स्वरूपात हे धोरण "स्वकीयांवर हिंसा करू नये" असे आहे. टोळ्यांपासून नागरी संस्कृती निर्माण झाली, तसे हे (सैद्धांतिक) धोरण पुढे चालू राहिले. फक्त टोळ्यांमध्ये "स्वकीय" कोण ही सहज व्याख्या आहे - आपल्या टोळीत जन्मलेला पुरुष = स्वकीय. नागर संस्कृतींमध्ये "स्वकीय"ची व्याख्या बदलत राहाते - याबाबत "राष्ट्र" ही कल्पना मागील काही शतकांत विकसित होऊ बघत आहे, पण कित्येक राष्ट्र-राज्ये इतकी मोठी आहेत, की टोळीबद्दल जी सहज आपुलकी आणि ओळख वाटे, ती राष्ट्रातील सर्व नागरिकांबाबत सहज वाटत नाही. कोण स्वकीय? हे स्पष्ट नसल्यामुळे राष्ट्र-हेच-कुटुंब किंवा विश्व-हेच-कुटुंब अशा प्रकारे काही लोक अहिंसा तत्त्वाची (सैद्धांतिक) व्याप्ती करतात. आशा प्रकारचे शब्द जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये दिसतात.

हे सैद्धांतिक धोरण प्रत्यक्षात कोणी स्वकीयांबद्दलही तंतोतंत पाळत नाही. त्यामुळे "स्वकीय"ची व्याप्ती वाढत राहिली, तसे हे धोरण लोक कमीकमीच वापरतात. यामध्ये भारतीयही आलेच. भारतामध्ये बाकी देशांपेक्षा हिंसा कमी आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. भारतात हिंसेच्या विरोधात तोंडपूजा खूप होते, पण तशी सर्वच देशांत होते.

- - -
गांधींनी अहिंसा हे धोरण म्हणून वापरले (अर्थात त्यांची ती श्रद्धाही होती). "क्विट इंडिया" भाषणात ते तसेच काही म्हणतात -

http://www.ibiblio.org/pha/policy/1942/420807a.html

"I want you to adopt non-violence as a matter of policy. With me it is a creed, but so far as you are concerned I want you to accept it as policy."

त्या नंतर हे धोरण म्हणून अनेक नेत्यांनी वापरलेले आहे. (वेळ आल्यास हिंसा वापरणारे नेल्सन मंडेला, आणि त्या पायरीपर्यंत न पोचलेले मार्टिन ल्यूथर किंग [धाकटे], हे तर प्रसिद्धच आहेत).

भारतात जनसामान्यांत इंग्रजविरोध हा फार प्रखर नव्हता. इंग्रजांसाठी त्या काळात पर्याय होता एतद्देशीय राजे-राजवाडे. या ऐशबाज राजवाड्यांबद्दल लोकांची राजभक्ती अगतिक होती. १८५७च्या युद्धात फक्त यमुना-गंगेच्या खोर्‍याने पेट घेतला, त्यातही जनसामान्याचा सहभाग कितपत होता कोणास ठाऊक. डुकराच्या आणि गाईच्या चरबीने पुसलेली काडतुसे शिपायांनाच त्रास देणार. खालसा झालेली राज्ये त्या राजे-राजवाड्यांनी आधीच स्वखुशीने ब्रिटिशांच्या स्वाधीन केली होती. लोकांना ब्रिटिशांचा खास राग वाटण्यासारखे काय होते? (देशाची आर्थिक लूट, वगैरे, हे सर्व अर्थशास्त्राच्या अभ्यासाने दिसू शकते. ते आकडे कोण्या सामान्य व्यक्तीला कसे दिसणार?)

जनसामान्यात जोवर इंग्रजविरोधी भावना चेतलेली नव्हती, तोवर हिंसक स्वातंत्र्यसैनिकांना फारसे यश मिळू शकणे दुरापरस्त दिसते. जे झाशीच्या राणीला जमले नाही, गनिमी कावा करत तात्या टोप्याला जमले नाही, ते चाफेकरांना एक-दोन ब्रिटिश अधिकारी मारून कसे जमणार होते?

ज्यांच्यासाठी चळवळ करायची, त्यांनाच चळवळ त्रासदायक वाटते, त्या परिस्थितीत हिंसा हे धोरण फारसे उपयुक्त नाही. आशा हिंसेत तडफदार चळवळी नेते नाहक मरतात. लोक पेटले असले, तरच ते बलिदान सत्कारणी लागते. अशा परिस्थितीत अहिंसक चळवळ हीच शक्य असते. विचार करूया - लोकमान्य टिळकांनी "हिंसक" असे नेमके काय केले - नव्हे, तेसुद्धा धोरणात्मक अहिंसा-पालकच होते. गांधींचे कल्पक वैशिष्ट्य असे, की वेगवेगळ्या नवनवीन अहिंसक क्रिया-प्रक्रिया योजून त्यांनी लोकांना असंतुष्ट केले. (लोकमान्य हे "असंतोषाचे जनक" होते, तर त्या असंतोषाला लहानाचे मोठे केले गांधींनी).

"अहिंसा" हे केवळ धोरण आहे, ही बाब गांधींना ज्ञात असावी. म्हणूनच काँग्रेस सरकारे होती (१९३५ मध्ये निवडणुका झाल्या) तिथे पोलीस खाती बरखास्त नाही झालीत. १९४७ मध्ये गांधींनी श्रद्धेस जागून हिंसेबद्दल तक्रार केली, पण काश्मीरात ऑक्टोबर १९४७ मध्ये भारतीय सैन्य जाण्याबद्दल खूप तक्रार केली नाही.

(५५ करोड रुपये पाकिस्तानाला देण्याबाबत सरकारला भाग पाडले, म्हणजे काश्मीर कारवाईसुद्धा ते अडचणीत आणू शकत होते...)

हा शांतताप्रिय अहिंसक नेता तसा सश्रद्ध असला तरी बराच धोरणी होता, मुत्सद्दी होता. त्यांची अनेक धोरणे त्यांना हवी तशी फळली नाहीत. पण हे तर सर्वच मुत्सद्द्यांचे होते. नाना फडणविसांना तरी १००% यश मिळत असे काय?

गांधींच्या धोरणांचा "पोलिटिकल सायन्स"च्या दृष्टीने, त्यांना फालतू देवत्व न देता विश्लेषण नरहर कुरुंदकरांनी "जागर" लेखसंग्रहात केलेले आहे. गांधी हे नेभळट किंवा पढतमूर्ख होते, ही कल्पना ते सप्रमाण खोडतात.

आपल्या शाळेतल्या पाठ्यपुस्तकांनी त्यांना चमत्कारी संत केले, आणि जनसंघाच्या नेतृत्वाने यडपट संतबोवा केले. मध्ये नेहरूंच्या भाटांनी पण त्यांना भाबडा संतबोवा केले. पण एक उत्तम राजकारणी म्हणून कुरुंदकरांनी मला त्यांची ओळख करून दिली, तेव्हा मला त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. ज्या नेत्याचे अनेक विचार पटत नाहीत, त्या नेत्याबद्दल जसा आदर वाटतो तसा आदर वाटतो.

भारताच्या सुस्त जनतेला हिंसेने (१८५७ चे मोठे प्रकरण, चाफेकर-कान्हेरे वगैरे स्थानिक प्रकरणे, यांनी) मुळीच जागे केले नाही, तिथे गांधीनी लाखोंना कामधंदा सोडून सरकारची आडवणूक करण्यास उद्युक्त केले."अहिंसा" तत्त्वाचा हा सुज्ञ वापर होय, असे मला वाटते. गांधींना राजकारण खेळता येत नव्हते, हे माझ्या मते त्यांच्याविरुद्ध त्यांच्या भक्तांनी केलेले लांछन आहे. आणि त्यांनी खेळलेल्या राजकारणाने भारताच्या जनतेचा (तोट्यापेक्षा अधिक) फायदा झाला नाही असे म्हणणेही तितकेच अज्ञानमूलक आहे, असे मला वाटते.

- डॉ.धनंजय वैद्य

3 comments:

HAREKRISHNAJI said...

खुप चांगला लेख आज वाचल्याच आनंद झाला.

Raj said...

Sundar lekh. ithe dilyabaddal anek aabhar.

आजानुकर्ण said...

55 कोटी, फाळणी आणि मुसलमान अनुनय वगैरेंचे गांधींवर होणारे आरोप कसे धादांत खोटे आहेत हे नरहर कुरुंदकरांनी अनेक भाषणांमध्ये दाखवून दिले आहे. ज्या खिलाफत चळवळीपासून गांधींवर हे आरोप होणे सुरू झाले त्याचे उत्तम विश्लेषण त्यांनी केले आहे.

पण ज्यांना हे समजून घेण्याची इच्छाच नाही ते लोक झोपेचे सोंग घेऊन वर घोरत राहतात. इथे अमेरिका, मेक्सिको, आफ्रिकेसकट सगळं जग गांधींच्या तत्त्वज्ञानाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना आपले लोक नथुरामचा उदोउदो करतात. त्यांना जागे व्हायचेच नाही हे जाणून आपणच गप्प राहणे सोयीस्कर.