अमेरिकेत नवीन नवीन राहायला आल्यावर मी आणि माझे रूममेट्स पाककलेच्या मागे लागलो. आम्हा तिघांपैकी कुणालाही जुजबी पाकशास्त्राच्या पलीकडे फारसे काही माहीत नव्हते आणि तोच तोच पिझ्झा वगैरे खाऊन कंटाळल्यावर स्वयंपाकघराला शरण जाण्यापासून पर्याय नव्हता. त्यातून तिघांनीही एकेकदा तरी घोळ घातले. पहिला माझा किस्सा. मी ठरवले छोले + भात असा सोपा मेन्यू करू. त्यासाठी चणे भिजत टाकले आणि एक तासाने ते भिजले आहेत असे समजून मस्त कांदा वगैरे चिरून फोडणीला टाकले. भारतातून खास आणलेला छोले मसालाही टाकला आणि चांगले ५-१० मिनिट परतले. मस्त वास सुटल्यावर मंडळींना हाक मारली आणि जेवणावर तुटून पडलो. ह्या सगळ्या गोंधळामध्ये ते छोले शिजवायचे असतात हे विसरूनच गेलो होतो. रादर माहीतच नव्हते. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली आणि वावा! तू तर अगदी छुपा रुस्तम निघालास तुला स्वयंपाक वगैरे येतो की असे मला चढवले पण हळू हळू जाणवायला लागले की छोले जरा कठीण आहेत. गंमत म्हणजे तरीही आम्ही सगळे चाटून पुसून संपवले आणि नंतर घरी फोनवर बोलताना सहज आईला हे सांगितल्यावर मला उलगडा झाला की आपण शिजवायलाच विसरलो!
दुसरा किस्सा माझ्या रूममेट नं१ चा. ह्याने प्लॅन केला की खीर बनवायची. घरी फोन करून आधीच रेसिपी वगैरे घेतली आणि नंतर मस्तपैकी दोनएक तास दूध आटवत खीर बनवली आणि जेवणानंतर थंडकरुन खाऊ म्हणून फ्रीजमध्ये ठेवून दिली. जेवताना आमचे अर्धे लक्ष फ्रीजमधल्या खिरीमध्येच होते. जेवल्यावर छान थंडगार खीर समोर आल्यावर आम्ही खायला सुरुवात केली आणि पहिल्याच घासाला कळले की काहीतरी बिनसले आहे. खीर थोडीशी तिखट/मसालेदार लागत आहे. थोड्यावेळाने अगदीच खाणे अशक्य झाल्यावर विचारले की बाबा तू नक्की ह्यात काय काय घातले आहेस त्यावर ह्याने यादी वाचून दाखवायला सुरू केली. दूध, तांदूळ, साखर, दालचिनी.... दालचिनीला आम्ही थबकलो आणि खुर्चीतून पडायचेच राहिलो होतो. झालं असं की ह्याचा दालचिनी आणि इलायची ह्यामध्ये घोळ झाला आणि इलायचीच्याजागी चांगली चमचा-दोन चमचा दालचिनीची पूड टाकली.
तिसरा किस्सा रूममेट नं. ३चा. ह्याला तल्लफ आली की मस्त पाऊस पडत असताना आल्याचा वाफाळता चहा घेऊ. स्वारी गाणी गुणगुणत स्वयंपाकघरात केली. छानपैकी कडक चहा उकळायला ठेवला आणि चांगली उकळी आल्यावर कपात ओतायला घेतला आणि इथे नेमकी गंमत झाली. चहा कपात ओतताना पूर्ण फाटून गेला आणि पिण्याच्या पलीकडे गेला. आता इंटेरोगेशनची पाळी ह्याची होती. नक्की काय काय केलेस सांग बाबा असे विचारल्यावर समजले की महाशयांनी आल्याचा चहा करायला शॉर्टकट म्हणून ताज्या आल्याच्या ऐवजी बाजारात मिळणारी 'जिंजर पेस्ट' टाकली. ही जी तयार 'जिंजर पेस्ट' मिळते त्यात आल्यासोबत टिकण्यासाठी व्हिनेगरही घातलेले असते आणि त्यांमुळे दूध फाटले होते. केस रीझॉल्व्ड!
तर असे आमचे हे पाककलेचे किस्से. आणि हो, ह्यात खरंच तीन वेगवेगळी पात्रे आहेत हा! माझ्याच तीन चुकांना तिघांच्या नावे खपवले असा गैरसमज करू नका :)
:D:D:D
hahahaha!!
Tari ikde cholle bijat tar ghatle!
magchya weli matki-chi ussal tar matki mod na antach karnar hota rao....